Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती बागेश्वर बाबांना आधीच होती?; स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 16:19 IST2023-06-05T15:56:40+5:302023-06-05T16:19:52+5:30
बालासोरसारख्या दुर्घटनांची आधीच माहिती मिळते का असं पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आले होते.

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती बागेश्वर बाबांना आधीच होती?; स्वत: केला खुलासा
नवी दिल्ली - ओडिशाच्या बालासोर इथं शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. त्यात २८० लोकांचा जीव गेला. तर ११०० हून अधिक जखमी झाले. या दुर्घटनेबाबत आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे विधान चर्चेत आले आहे. अशा घटनांबाबत आधीच संकेत मिळतात. परंतु घटना माहिती असणे आणि ती टाळणे हे दोन्ही वेगवेगळे आहे असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे.
बालासोरसारख्या दुर्घटनांची आधीच माहिती मिळते का असं पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आले होते. त्यावर धीरेंद्र यांनी काही घटनांचे संकेत मिळतात. माहिती असणे आणि ते टाळणे हे वेगळे असते. श्रीकृष्ण भगवानला महाभारत होणार हे माहिती होते परंतु ते टाळू शकले नाही असं सांगत बागेश्वर बाबाने रेल्वे अपघाताची जी घटना घडली तशी पुन्हा होऊ नये. जखमी लवकरात लवकरत बरे होवो अशी प्रार्थना केली.
नेटिझन्सने केले बागेश्वर बाबांना ट्रोल
बाबा बागेश्वर म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या चमत्कारांसाठी देशभर प्रसिद्ध आहेत. पर्ची काढून प्रत्येकाच्या भूतकाळात डोकावल्याचा ते दावा करतात. काही वेळा ते भविष्य सांगतानाही दिसतात. मात्र बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबतच्या दाव्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. बाबांकडे भविष्य पाहण्याची ताकद असताना त्यांनी बालोसर रेल्वे अपघात का टाळला नाही, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. किंवा अपघाताबाबत आगाऊ माहिती का दिली नाही जेणेकरून अपघात टाळता येईल. त्याचप्रमाणे लोक अनेक प्रकारचे प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांना विचारत आहेत.
विरोधकांनी साधला निशाणा
बाबा बागेश्वर यांच्या या दाव्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी प्रश्न उपस्थित केला की, 'मोठ्या घटनांचे संकेत मिळाले तर त्यांनी रेल्वे अपघाताबाबत का सांगितले नाही? बाबा बागेश्वर राजकारण करतात आणि त्यांचा अजेंडा हिंदु राष्ट्र आहे. बाबा बागेश्वर यांचा धर्माशी काहीही संबंध नसून ते राजकारण करत असल्याचा आरोप उदित राज यांनी केला.