Odisha Train Accident : 7 मृतदेहांमध्ये अडकलेला मुलगा, 2 दिवस शोधत होता मोठा भाऊ; अखेर 'असा' झाला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 14:14 IST2023-06-05T14:08:06+5:302023-06-05T14:14:35+5:30
Odisha Train Accident : एक अंगावर काटा आणणारी घटना आता समोर आली आहे. दहा वर्षांच्या मुलाचा जीव अत्यंत भीषण परिस्थितीतही वाचला आहे.

Odisha Train Accident : 7 मृतदेहांमध्ये अडकलेला मुलगा, 2 दिवस शोधत होता मोठा भाऊ; अखेर 'असा' झाला चमत्कार
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 270 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी सुमारे 1000 लोक जखमी झाले. या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला. घटनास्थळावरील फोटो भयंकर आहेत. मात्र, तब्बल 51 तासांनंतर पुन्हा रुळावरून गाड्यांची वाहतूक सुरू झाली. या दुर्घटनेतून अनेकांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. काहींनी खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना आता समोर आली आहे. दहा वर्षांच्या मुलाचा जीव अत्यंत भीषण परिस्थितीतही वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालासोरमधील भोगरई येथील दहा वर्षीय देबाशीष पात्रा, बहनागा बाजार येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर सात मृतदेहांच्या खाली अडकला होता. त्याच्या कपाळावर, चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. शनिवारी गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या मोठ्या भावाने त्याला वाचवलं. देबाशीष हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असून त्याच्यावर एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागात उपचार सुरू आहेत. तो शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेसने कुटुंबीयांसह भद्रकला जात होता.
देबाशीषने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या वडिलांनी भद्रकसाठी कोरोमंडल एक्सप्रेसची तिकिटं बुक केली होती, तिथे काका आणि काकू आम्हाला घेण्यासाठी थांबले होते, आमची वाट होते. तिथून आम्ही पुरीला जायचा प्लॅन केला. माझे वडील, आई आणि मोठा भाऊ यांनी सहलीची योजना आखली होती आणि सर्व माझ्यासोबत प्रवास करत होते."
पुढे त्याने सांगितले, "शुक्रवारी संध्याकाळी ट्रेन बालासोरहून निघाल्यानंतर काही मिनिटांत, मी माझ्या आईजवळ बसलो होतो आणि अचानक मोठा आवाज झाला, त्यानंतर मोठा धक्का बसला आणि सर्वत्र अंधार झाला. मी बेशुद्ध झालो आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला भयंकर वेदना होत होत्या आणि मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली अडकलो होतो.'' मोठा भाऊ सुभाषीष, जो दहावीचा विद्यार्थी होता, तो दोन दिवस आपल्या भावाचा शोध घेत होता. अखेर चमत्कार झाला. त्याने देबाशीषला शोधून काढलं आणि वाचवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.