मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:17 IST2025-07-22T17:15:30+5:302025-07-22T17:17:55+5:30
नवरा-बायको दोघेही हसत होते आणि खूप विनोद करत होते. याच दरम्यान महिला अचानक वरून खाली पडली.

फोटो - nbt
हरियाणातील गुरुग्राममध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चौथ्या मजल्यावरून पडून २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आत्महत्या किंवा हत्या नाही तर तो एक अपघात होता. महिलेचा नवरा तिच्यासमोरच होता. नवरा-बायको दोघेही हसत होते आणि खूप विनोद करत होते. याच दरम्यान महिला अचानक वरून खाली पडली.
पार्वती आणि दुर्योधन यांचं दोन वर्षांपूर्वी ओडिशाहून चांगल्या भविष्याच्या शोधात एनसीआर शहरात आले होते. १५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता ते गच्चीवर आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत होते. त्यांच्या संभाषणाची सुरुवात हास्य आणि विनोदांनी झाली. त्यानंतर पार्वती अचानक कठड्यावर चढली. तिने हसत हसत तिच्या पतीला विचारलं की, जर मी पडले तर तू मला वाचवशील का?
पार्वती असं बोलून खाली उतरत असताना अचानक तिचा पाय घसरला. दुर्योधन (२८) ने लगेच तिला पकडण्याचा प्रयत्न केला. तिचा हातही धरला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. सुमारे दोन मिनिटं त्याने मदतीसाठी हाक मारली. पण आजूबाजूला कोणीही नव्हतं. अखेर त्याची पकड सैल झाली आणि पार्वती खाली पडली.
पार्वतीला उपचारासाठी तातडीने एका खासगी रुग्णालयात नेलं. मात्र अर्ध्या तासाच्या आत पार्वतीचा मृत्यू झाला.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अडीच वर्षापूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. ते दोघंही खासगी कंपनीत काम करत होते. रात्री गरम होत असल्याने ते गच्चीवर गेले होते. याच दरम्यान ही भयंकर घटना घडली. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
शवविच्छेदनानंतर पार्वतीचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पत्नीच्या जाण्याने दुर्योधन खूप दुःखी आहे. त्याने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्याने "तू माझं जीवन आहेस, तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस. प्लीज परत ये. मी तुझा आवाज ऐकण्याची, तु्झ्या स्पर्शाची वाट पाहत आहे" असं म्हटलं आहे.