माणुसकीला काळीमा! जातीमुळे मुलाने सायकलवरून नेला आईचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:45 IST2019-01-17T15:07:06+5:302019-01-17T15:45:22+5:30
जाती व्यवस्थेमुळे महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मदत नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांनी मदत नाकारल्यामुळे करपाबाहाल गावातील एका 17 वर्षीय मुलाला आपल्या आईचा मृतदेह हा सायकलवरून अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला.

माणुसकीला काळीमा! जातीमुळे मुलाने सायकलवरून नेला आईचा मृतदेह
भुवनेश्वर - ओडिशातील करपाबाहाल गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जाती व्यवस्थेमुळे महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मदत नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांनी मदत नाकारल्यामुळे करपाबाहाल गावातील एका 17 वर्षीय मुलाला आपल्या आईचा मृतदेह हा सायकलवरून अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला.
सरोज असे या मुलाचे नाव आहे. सरोज आणि त्याची मृत आई जानकी सिन्हानिया कनिष्ठ जातीतील असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्याला अंत्यसंस्कारासाठी मदत नाकारली. जानकी पाणी भरण्यासाठी गेल्या असता तिथे पाय घसरून त्या पडल्या. डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र शेजाऱ्यांनी केवळ जात या कारणामुळे सरोजला अंत्यसंस्कारासाठी मदत करण्यास नकार दिला. घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत सायकलवरुन मृतदेह नेल्यानंतर सरोजने जंगलामध्ये मृतदेहाचे दफन केले. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.