ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर भाजपा नेत्याच्या समर्थकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
महानगरपालिका आयुक्त रत्नाकर साहू यांना सार्वजनिक तक्रार निवारण बैठकीदरम्यान कार्यालयात काही तरुणांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की, काही तरुण साहू यांना शिवीगाळ करताना बेदम मारहाण केली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली, ज्यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
सोमवारी सार्वजनिक सुनावणीदरम्यान बीएमसी आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर सुमारे पाच ते सहा जणांनी हल्ला केला. काही लोक त्यांच्या चेंबरमध्ये गेले आणि त्यांची कॉलर पकडली. व्हिडिओमध्ये काही जण आयुक्तांना लाथा मारत आणि डोक्यावर हल्ला करताना दिसत आहेत. साहू यांच्यावर भाजपा नेते जगन्नाथ प्रधान यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली.
आयुक्त रत्नाकर साहू यांनी सांगितलं की, जेव्हा ते जनसुनावणी घेत होते तेव्हा ५ ते ६ लोक त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांना वाटलं की, ते तक्रार घेऊन आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत एक नगरसेवकही उपस्थित होता, ज्यांनी सांगितलं की त्यांनी भाजपा नेते जगन्नाथ प्रधान यांच्याशी गैरवर्तन केलं आहे. या संभाषणादरम्यान त्यांनी मला मारहाण केली आणि फरफटत नेलं. मारहाण केल्यानंतर त्या लोकांनी माझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला.