महाराष्ट्रात 'आप'ची रणनीती; माजी खासदाराचा अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:44 IST2022-08-21T15:44:02+5:302022-08-21T15:44:51+5:30
पंजाब विधानसभेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार वाढवत आहेत.

महाराष्ट्रात 'आप'ची रणनीती; माजी खासदाराचा अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत प्रवेश
नवी दिल्ली - राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. त्यात आता दिल्ली, पंजाब, गोवा नंतर आम आदमी पक्षाने गुजरात आणि महाराष्ट्रात पक्षसंघटना वाढीवर भर दिला आहे. महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठी आपनंही प्रवेश सत्र सुरू केले आहे. त्यात माजी खासदार आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपमध्ये प्रवेश घेतला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामाची प्रशंसा सर्वदूर असून त्यांच्या काम की राजनीतीमुळे प्रभावित होऊन आम आदमी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला असं माजी खासदार आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि माजी पोलीस अधिकारी राहिलेले धनराज वंजारी यांनीही केजरीवालांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केला. राठोड आणि वंजारी यांच्या पक्षप्रवेशावेळी महाराष्ट्रातील आपच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा आणि धनंजय शिंदे हेदेखील उपस्थित होते.
Huge boost for AAP in Maharashtra!
— AAP (@AamAadmiParty) August 21, 2022
Prominent OBC leader & ex-MP Haribhau Rathod and former Police Officer Dhanraj Vanjari join Aam Aadmi Party.
Inspired by CM @ArvindKejriwal's stellar leadership, good people from all corners are coming together to #MakeIndiaNo1 🇮🇳 pic.twitter.com/uf7YN7UrFb
महाराष्ट्रात एकेकाळी भाजपाचे लोकसभा खासदार असलेले हरिभाऊ राठोड हे बंजारा समाजातील ओबीसींचे प्रतिष्ठित नेते आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. २००४ ते २००८ पर्यंत ते लोकसभेचे खासदार होते. त्यानंतर भाजपात झालेल्या मतभेदामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. हरिभाऊ राठोड हे २०१३ मध्ये काँग्रेसमध्ये शामील झाले होते. त्यांना विधान परिषदेचं सदस्य बनवण्यात आले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत राठोड यांनी शिवसेनेशी जवळीक साधली.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर 'आप'ची नजर
पंजाब विधानसभेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार वाढवत आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर आपची नजर आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपची भूमिका राष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याचं केजरीवालांचे लक्ष्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशभरातील ओबीसी समुदायातील लोकांना पक्षासोबत जोडण्यासाठी हरिभाऊ राठोड यांचा आपमध्ये पक्षप्रवेश फायदेशीर ठरू शकतो.