महिला कर्मचाऱ्यांची संख्या घटली
By Admin | Updated: March 5, 2015 22:57 IST2015-03-05T22:57:47+5:302015-03-05T22:57:47+5:30
अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

महिला कर्मचाऱ्यांची संख्या घटली
सुरक्षेची चिंता : असोचेमचे सर्वेक्षण
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून असोचेमने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार रात्रपाळी, उशिरापर्यंत थांबावे लागणे किंवा कार्यालय वा कामाचे ठिकाण शहराबाहेर असणे, अशा कारणांमुळे महिला कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षात २६.५ टक्क्यांनी घटली आहे.
मागची दोन वर्षे अर्थव्यवस्थेत मंदी होती. त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या दृष्टीने संधीही कमी झाल्या. ही स्थिती बदलण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने सक्रिय भूमिका घेणे जरूरी आहे.
२० ते ५० वर्षे वयोगटातील जवळपास १,६०० महिलांशी केलेल्या चर्चेच्या आधारे तयार करण्यात आलेला हा सर्वेक्षणात्मक अहवाल येथे एका कार्यक्रमात जारी करण्यात आला. यावेळी अलका लांबा, स्पाईस ग्रुपच्या कार्पोरेट समूह अध्यक्ष प्रीती मल्होत्रा आदींची उपस्थिती होती. दिल्लीला महिलांसाठी अनुकूल राजधानी करण्याची गरज आहे.
तसेच महिलांमधील असुरक्षिततेची भावनाही दूर करणे जरूरी आहे, असे मत आम आदमी पार्टीच्या अलका लांबा यांनी व्यक्त केले.
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रीती मल्होत्रा यांनी सांगितले.
घर सांभाळून महिला नोकरीही करतात. आरामदायी कल्याणासोबत त्यांना सुरक्षा दिल्याशिवाय त्यांच्या लोकसंख्येचा फायदा घेता येणार नाही, असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यावेळी सांगितले.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४८ टक्के महिलांचे म्हणणे आहे की, निर्भया प्रकरणानंतरच्या दोन वर्षादरम्यान सुरक्षेची चिंता कमी होण्याऐवजी वाढली आहे. दिल्लीनंतर बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, लखनौतील स्थिती महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नाही.
राष्ट्रीय गुन्हा नोंदणी केंद्राच्या २०१२ च्या आकडेवारीनुसार महिलांविरोधी गुन्ह्यांत १४.२ टक्क्यांनी दिल्लीचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बंगळुरु (६.२ टक्के), कोलकात्याचा (५.७ टक्के ) क्रमांक लागतो.