एनएसजी कमांडो काश्मीरमध्ये दाखल, दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 22:07 IST2018-06-21T22:07:32+5:302018-06-21T22:07:32+5:30
श्रीनगर इथल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तळावर सध्या एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे.

एनएसजी कमांडो काश्मीरमध्ये दाखल, दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची शक्यता
श्रीनगर- श्रीनगर इथल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तळावर सध्या एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण सुरु असून आता लवकरच काश्मीर खोऱ्यात एनएसजी कमांडो तैनात होणार आहेत. 'ब्लॅक कॅट कमांडो' अशी या कंमांडोची ओळख आहे. एनएसजी ही भारताची एलिट कमांडो फोर्स आहे. काळ्या रंगाचा युनिफॉर्म (ब्लॅक युनिफॉर्म) ही या फोर्सची ओळख असून अचूक नेम साधणारे एनएसजीचे जवळपास दोन डझन स्नायपर्स मागच्या दोन आठवडयांपासून जोरदार सराव करत असल्याचं वृत्त आहे.
भाजपाने जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यातील सरकार पडलं असून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये एनएसजी कमांडो पाठविण्याचा निर्णय आधीच केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. काश्मीरात कमांडो पथक दाखल झाल्यानंतर हे सर्वात आधी त्यांना खडतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली जाणार आहे. जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या मोहिमांमध्ये हे पथक भाग घेईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे.
काश्मीर खोऱ्यात लवकर तुम्हाला एनएसजी कमांडो दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना दिसतील. काश्मीर खोऱ्यात केंद्राला दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग द्यायचा आहे. एनएसजी कमांडोंच्या उपस्थितीमुळे सुरक्षा दलांची जिवीतहानी कमी होईल असं अधिकाऱ्याने सांगितलं.