संकटं संपेनात! कोरोनापाठोपाठ झिका विषाणूची एंट्री; १३ रुग्ण सापडल्यानं खळबळ; जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:48 PM2021-07-08T21:48:00+5:302021-07-08T21:50:26+5:30

zika virus: १३ रुग्णांमध्ये एका गर्भवतीचा समावेश; अधिक तपासणीसाठी नमुने पुण्याला पाठवले

now zika threat 13 cases including pregnant woman found in kerala know the symptoms | संकटं संपेनात! कोरोनापाठोपाठ झिका विषाणूची एंट्री; १३ रुग्ण सापडल्यानं खळबळ; जाणून घ्या लक्षणं

संकटं संपेनात! कोरोनापाठोपाठ झिका विषाणूची एंट्री; १३ रुग्ण सापडल्यानं खळबळ; जाणून घ्या लक्षणं

Next

थिरुअनंतपुरम: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आता झिका विषाणूनं एंट्री घेतली आहे. केरळमध्ये आतापर्यंत १३ जणांना झिकाची लागण झाली आहे. त्यात एका गर्भवतीचा समावेश आहे. तिरुअनंतपुरमधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत. 

तिरुअनंतपुरममधल्या एका खासगी रुग्णालयात २८ जूनला एका २४ वर्षीय गर्भवतीला दाखल करण्यात आलं. या महिलेला ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा स्वरुपाचा त्रास होत होता. जिकाची लक्षणं असल्यानं पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले. झिकाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

सात जुलैला महिलेची प्रसुती
महिलेनं ७ जुलैला बाळाला जन्म दिला. झिकाची लागण झालेली महिला राज्याबाहेर गेलेली नव्हती. झिकाग्रस्त महिला केरळच्या सीमावर्ती भागाची रहिवासी आहे. या विषाणूची लक्षणं दिसायला ३ ते १४ दिवस लागतात. बहुतांश लोकांमध्ये लक्षणंदेखील दिसत नाहीत. काही लोकांना ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मांसपेशी आणि सांधेदुखीची समस्या जाणवते. 

पहिल्यांदा युगांडातील माकडांमध्ये सापडला होता झिका
जागतिक आरोग्य संघटनेकडे असलेल्या नोंदीनुसार, झिका विषाणू एडीज डास चावल्यानं पसरतो. हे डास संध्याकाळी जास्त सक्रीय असतात. युगांडात पहिल्यांदा १९४७ मध्ये माकडांमध्ये झिका विषाणू सापडला. यानंतर १९५२ मध्ये युगांडा आणि टांझानियात माणसांना या विषाणूची लागण झाली. आशिया, आफ्रिका, अमेरिका, पॅसिफिक महासागरातील बेटांवर आतापर्यंत झिकाचे रुग्ण सापडले आहेत.
 

Web Title: now zika threat 13 cases including pregnant woman found in kerala know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.