आता कुत्र्या, मांजरांवरही द्यावा लागणार कर, या राज्यातील सरकारचा अजब आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 18:40 IST2017-10-24T18:39:49+5:302017-10-24T18:40:51+5:30
निधी उभारण्यासाठी सरकारकडून विविध वस्तू सेवा यांच्यावर कर बसवण्यात येत असते. पण सरकारने चक्क कुत्र्या, मांजरांसह सर्व पाळीव प्राण्यांवर कर लादण्याचा घाट घातला आहे.

आता कुत्र्या, मांजरांवरही द्यावा लागणार कर, या राज्यातील सरकारचा अजब आदेश
चंदिगढ - निधी उभारण्यासाठी सरकारकडून विविध वस्तू सेवा यांच्यावर कर बसवण्यात येत असते. पण पंजाब सरकारने चक्क कुत्र्या, मांजरांसह सर्व पाळीव प्राण्यांवर कर लादण्याचा घाट घातला आहे. पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूच्या मंत्रालयाने हा अजब निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पाळीव प्राण्यांवर लागू करण्यात आलेल्या करामुळे पंजाबी जनतेला प्राणी पाळण्यासाठी आता खिशाला कात्री लावावी लागणार आहे. पाळीव प्राण्यांवरील करासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार कुत्रा, मांजर, डुक्कर, बकरी, हरीण आदी प्राणी पाळल्यास त्यावर दरवर्षी सुमारे 250 रुपये कर द्यावा लागेल.
तर म्हैस, बैल, उंट, घोडा, गाय, हत्ती आणि सांबर आदी प्राणी पाळल्यास त्यावर दरसाल 500 रुपये कर जमा करावा लागेल. राज्यातील प्रत्येक पाळीव जनावरासाठी ब्रँडिंग कोड असेल, त्यासाठी ओळख क्रमांक दिला जाईल किंवा मायक्रोचिप लावण्यात येईल, असे पंजाब सरकारने सांगितले.
पंजाब सरकार याआधीपासूनच गो सेसत्या नावाखाली अनेर वस्तूंवर कर आकारत आहे. पण आता घरात पाळल्या जाणाऱ्या जनावरांवरही कर आकारला जाईल. पाळीव जनावरांसाठी परवाने बनवण्यात येणार असून, या परवान्यांचे दरवर्षी नुतनीकरण केले जाईल. तसेच परवाने नुतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.