आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 06:13 IST2025-12-18T06:13:06+5:302025-12-18T06:13:24+5:30
यात नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल.

आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
नवी दिल्ली: देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर मल्टी-लेन फ्री फ्लो टोल प्रणाली आणि एआय आधारित महामार्ग व्यवस्थापन २०२६ अखेर पूर्णपणे अंमलात येणार असून, यामुळे टोल नाक्यांवरील प्रतीक्षा पूर्णतः संपेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. टोल चोरी थांबेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होईल, असेहे ते म्हणाले.
यात नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल. परिणामी वाहनांना टोलवर थांबावे लागणार नाही. पूर्वी टोल भरण्यास ३ ते १० मिनिटे लागत. फास्टंगमुळे हा वेळ ६० सेकंदांपर्यंत आला. मल्टी-लेन फ्री फ्लो टोलनं वाहनांना कमाल ८० किमी प्रतितास वेगाने टोल पार करता येईल आणि कुणालाही थांबवले जाणार नाही.
महाराष्ट्रातील टोल वसुली किती?
२०२०-२१ - २५९०.८५ कोटी
२०२१-२२ - ३३८६.२१ कोटी
२०२२-२३ - ४६६०.२१ कोटी
२०२३-२४ - ५३५२.५३ कोटी
२०२४-२५ - ५११५.३८ कोटी
सरकारला फायदा काय?
- ६,००० कोटी रुपयांचा सरकारी महसूल वाढणे अपेक्षित
- १,५०० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत यामुळे होईल.
"टोलवरील वेळ शून्य मिनिटांपर्यंत आणण्याचा आमचा उद्देश आहे. २०२६ पर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण केले जाईल. केंद्राची जबाबदारी राष्ट्रीय महामार्गापुरती आहे. राज्य महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवरील समस्या अनेकदा सोशल मीडियावर राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्या जातात, परंतु त्या केंद्राच्या अखत्यारित येत नाहीत."
- नितीन गडकरी, केंद्रीय महामार्ग मंत्री