बीबीसीला केंद्राची नोटीस
By Admin | Updated: March 6, 2015 09:16 IST2015-03-06T00:11:35+5:302015-03-06T09:16:21+5:30
वादग्रस्त डॉक्युमेंट्रीचे प्रसारण न करण्याच्या भारत सरकारच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून बीबीसीने बुधवारी रात्री १० वाजता ही डॉक्युमेंट्री ब्रिटनमध्ये प्रसारित केली.

बीबीसीला केंद्राची नोटीस
ब्रिटनमध्ये प्रसारण : भारताचा सल्ला धुडकावला
नवी दिल्ली : दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडावर तयार करण्यात आलेल्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीचे प्रसारण न करण्याच्या भारत सरकारच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून बीबीसीने बुधवारी रात्री १० वाजता ही डॉक्युमेंट्री ब्रिटनमध्ये प्रसारित केली. त्यामुळे संतप्त झालेल्या केंद्र सरकारने आता बीबीसीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, ही डॉक्युमेंट्री भारतात दाखविण्याची आपली योजना नाही, असे बीबीसीने केंद्रीय गृहमंत्रालयाला कळविले आहे. दरम्यान, भारत सरकारने ही डॉक्युमेंट्री प्रसारित केल्याबद्दल बीबीसीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही डॉक्युमेंट्री दुपारपर्यंत ‘यू ट्यूब’वर उपलब्ध होती; परंतु माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितल्यावरून दुपारनंतर ‘यू ट्यूब’ने ही डॉक्युमेंट्री काढून टाकली.
‘डॉक्युमेंट्रीचा व्यावसायिक हेतूसाठी वापर केला जाणार नाही, या करारात असलेल्या अटीचा भंग करण्यात आला आहे आणि त्याबद्दल ही ब्रिटिश मीडिया संस्था कायदेशीर कारवाईस पात्र ठरत आहे,’ असे या नोटिशीत म्हटले आहे. ‘बीबीसीतर्फे डॉक्युमेंट्रीचा व्यावसायिक वापर करण्याची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही बीबीसीवर बुधवारी सायंकाळी कायदेशीर नोटीस बजावली आहे आणि आता त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे,’ असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘या डॉक्युमेंट्रीचे प्रसारण करू नका, असे आम्ही बीबीसीसह अन्य सर्वच चॅनल्सना सांगितलेले होते. आता बीबीसीविरुद्ध जी काही कारवाई करायची आहे, ती गृृहमंत्रालय करील. नियमांचा भंग झाला असेल तर उचित कारवाई केली जाईल. मी माहिती व प्रसारण मंत्रालयाशी बोललो आहे आणि विदेश मंत्रालयालाही पत्र लिहिले आहे,’ असे गृहमंत्री राजनाथसिंग यांनी म्हटले आहे.
पिता कोर्टात खेचणार
बल्लिया : बीबीसीने तयार केलेल्या या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीच्या प्रसारणाला ‘निर्भया’च्या पालकांनी प्रखर विरोध केला आहे. यात आपल्या मुलीच्या नावाचा उल्लेख करण्यावर तीव्र हरकत घेऊन या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही ‘निर्भया’च्या पित्याने दिला.‘माझ्या मुलीचे नाव व छायाचित्र सार्वजनिक करू नका असे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही त्यांनी तसे केले. हे योग्य नाही. आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू,’ असे ‘निर्भया’च्या पित्याने म्हटले आहे.
भारतात प्रसारण नाही-बीबीसी
ही वादग्रस्त डॉक्युमेंट्री भारतात दाखविण्याची कोणतीही योजना नाही, असे बीबीसीने जाहीर केले आहे. भारत सरकारच्या निर्देशांचे पालन करीत या डॉक्युमेंट्रीचे प्रसारण भारतात केले जाणार नाही, असे बीबीसीने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या एका संदेशात म्हटले आहे.
ब्रिटिश चित्रपट निर्माती लेस्ली उडविन यांच्याविरुद्ध अनुमतीच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपात कारवाई करण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चित्रीकरणाची अनुमती देणाऱ्या नियमांची समीक्षा केली जाईल, असे राजनाथसिंग यांनी म्हटले होते.
‘सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही सर्व तथ्य तपासून पाहत आहोत.’
-राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री