अहिंसा, गरिबीचे उच्चाटन, सर्वश्रेष्ठ भारत - पंतप्रधान मोदींचा मंत्र

By Admin | Updated: August 15, 2014 09:12 IST2014-08-15T08:50:47+5:302014-08-15T09:12:00+5:30

अहिंसेच्या माध्यमातून सर्व शेजारच्या राष्ट्रांशी सहकार्य करून गरीबीचं उच्चाटन करु असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाचे पहिले भाषण करताना म्हटले आहे.

Nonviolence, elimination of poverty, Best of India - Mantra of Prime Minister Modi | अहिंसा, गरिबीचे उच्चाटन, सर्वश्रेष्ठ भारत - पंतप्रधान मोदींचा मंत्र

अहिंसा, गरिबीचे उच्चाटन, सर्वश्रेष्ठ भारत - पंतप्रधान मोदींचा मंत्र

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५ - गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांचे दाखले देत भारताचा भर अहिंसेच्या माध्यमातून सर्व शेजारच्या राष्ट्रांशी सहकार्य करून गरीबीचं उच्चाटन करण्यावर असल्याचं सांगत भारताला जगन्माता बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाचं पहिलं भाषण करताना भारतीयांना दाखवलं.
स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून उत्स्फुर्त भाषण केले. सुमारे तासभर झालेल्या भाषणात त्यांनी अंहिसा, स्त्रीभ्रूण हत्या, स्वच्छता, उद्योग अशा विविध विषयांवर भाष्य केले. या सोहळ्यासाठी सुमारे साडेबारा हजार नागरिक उपस्थित होते. 
 
पंतप्रधान नव्हे प्रधानसेवक
मी देशाचा पंतप्रधान म्हणून नव्हे तर प्रधानसेवक म्हणून तुमच्याशी बोलायला आलोय असे सांगत मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. 'भारताला शेतकरी, कामगार वर्गाने घडवले आहे. भारताच्या वाटचालीत सर्व माजी पंतप्रधानांचे मोलाचे योगदान होते' असे मोदींनी नमूद केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणा-या स्वातंत्र्यवीरांना आणि देशाचे रक्षण करणा-या जवानांना मी वंदन करतो असे मोदींनी सांगितले. सरकार सर्व पक्षांना घेऊन पुढे चालत असून विरोधी पक्षांनी दिलेल्या सहमतीसाठी मोदींनी त्यांचे आभार मानले. 
 
सरकारी अधिका-यांना कानपिचक्या
लालकिल्ल्यावरील पहिल्याच भाषणात मोदींनी प्रशासकीय यंत्रणेवर जोरदार टीका केली. देशातील सरकारी अधिकारी वेळेवर कामावर येतात ही बातमी होते हे दुर्दैवी असल्याचे मोदींनी सांगितले. सरकारी संस्थेत काम करणारे सर्व्हीस करतोय असे सांगतात. तर खासगी कंपनीत काम करणारे जॉब करतोय असे सांगतात. मात्र सध्या सरकारी सेवेची शक्ती कमी झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेने कामकाजात वाढ करायची गरज आहे असे मोदींनी नमूद केले. 
 
तीन प्रमुख योजनांची घोषणा
स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर मोदींनी तीन महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. जन धन योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरिबाच्या नावाने बँक खाते सुरु करण्यात येईल. बँक खाते उघडताच प्रत्येक गरिबाला एक लाख रुपयांचा विमा दिली जाईल. संसद ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून देशातील गावांचा विकास केला जाईल. २०१६ मध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असून योजनेची ब्लू प्रिंट ११ ऑक्टोंबरला जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीला दिली जाईल. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने त्यांच्या भागातील एका गावाची निवड करुन त्या गावाचा सर्वांगिण विकास करावा. दरवर्षी एका गावाचा विकास असा संकल्प प्रत्येक खासदाराने करावा असे मोदींनी सांगितले. 
 
स्त्रीभ्रूणहत्येला विरोध
स्त्रीभ्रूण हत्येचा विरोध दर्शवताना मोदी म्हणाले, डॉक्टरांनी विज्ञानाचा वापर स्वतःची तिजोरी भरण्यासाठी करु नये. माता - भगिनींनी मुलाच्या आशेने स्त्रीभ्रूण हत्येचा मार्ग स्वीकारु नये. स्त्रीशक्तीचे उदाहरण देत मोदी म्हणाले, पाच - पाच मुल असूनही आईवडिलांना वृद्धाश्रमात राहावे लागले. तर केवळ एक मुलगी असून त्या मुलीने लग्न न करता आईवडिलांची सेवा केल्याचे मी बघितले आहे. राष्ट्रकुलस्पर्धेत निम्मे पदकं मुलींनीच मिळवून दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली. मुलींवर निर्बंध घालणा-या पालकांनी मुलांवरही तेवढेच निर्बंध घालायला हवे असे मोदींनी स्पष्ट केले.
 
स्वच्छ भारत
भारतात पर्यटनावर भर देण्याची गरज आहे. मात्र अस्वच्छता ही पर्यटनातील प्रमुख अडचण आहे. स्वच्छतेसाठी फक्त सरकार काम करु शकत नाही. यासाठी जनसहभाग हवा असे मोदींनी म्हटले. गावातील महिलांना आजही उघड्यावर शौचासाठी जावे लागते हे दुर्दैव असून यामुळे त्या माताभगिनींनी आजारही होऊ शकतात असे त्यांनी नमदू केले. २०१९ पर्यंत आपण भारताला स्वच्छ करुया असा संकल्पही मोदींनी केला. तर प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह असेल यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी घोषणाही मोदींनी केली. 
 
गरिबीपासून स्वातंत्र्य
शस्त्र आणि सत्तेशिवाय स्वातंत्र्यलढ्यातील महान नेत्यांनी परराष्ट्र शक्तींना देशातून पळवून लावले. तर मग आता आपण सर्व मिळून गरिबीविरोधात लढा देऊ असा निर्धार मोदींनी केला. 
 
माझ काय, मला काय ही भूमिका नको
सध्या कोणाकडेही काम घेऊन गेल्यास मला काय, माझे काय असा प्रश्न विचारला जातो. पण ही भूमिका सोडून राष्ट्रहिताचा विचार सर्वांनी करायला पाहिजे. प्रत्येक जण एक पाऊल पुढे गेल्यास देश खुप पुढे जाईल असे मोदींनी सांगितले. 
 
हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहन
देशातील नक्षलवादी, माओवादी आणि दहशतवादी मार्गावर गेलेल्या तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडावा असे आवाहन मोदींनी केले. खांद्यावर बंदूक घेऊन जमीन लाल करण्याऐवजी खांद्यावर नांगर घेतल्यास भारत हिरवेगार होईल असे विधान त्यांनी केले. देशात जातीय हिंसाचारामुळे कोणाचाच फायदा झाला नाही. त्यामुळे एकमेकांशी भांडण्याऐवजी बंधूत्व आणि सदभावनेच्या मार्गावर चालून देशाला पुढे नेऊया असे त्यांनी म्हटले. 
 
कम मेक इन इंडिया
भारताने उत्पादन क्षेत्रात भर दिल्यास त्याचा फायदा तरुणांनाच होईल असे सांगत  जगभरातील उद्योजकांनी  उत्पादनासाठी भारतात यावे. कम मेक इन इंडिया असा नवा नारा मोदींनी दिला. जगभरात मेड इन इंडिया उत्पादन पोहोचायला हवे असा संकल्पही त्यांनी केला. 
 
नियोजन आयोग बरखास्त 
नियोजन आयोग बरखास्त करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात नियोजन आयोग बरखास्त करुन त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करु. यात राज्य सरकारलाही स्थान दिले जाईल अशी शाश्वतीही त्यांनी दिली. 
 
 

Web Title: Nonviolence, elimination of poverty, Best of India - Mantra of Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.