नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता बालहक्क चळवळीचे कार्यकर्ते व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या नोबेल पारितोषिकाचेही दर्शन घेता येणार आहे. त्यांनी आपले हे पारितोषिक देशाला अर्पण केले असून ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सुपूर्द केले आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात सत्यार्थी यांनी हे पारितोषिक राष्ट्रपती मुखर्जी यांच्या स्वाधीन केले. सत्यार्थी यांनी एक उत्तम काम केले असून ज्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली व त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. देशवासीयांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो असे मुखर्जी यांनी यावेळी म्हटले. हे पदक १८ कॅरेट सोन्याचे असून त्याचे वजन १९६ ग्रॅम एवढे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)ते राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. ते आता या संग्रहालयाचा भाग असून नागरिकांना ते पाहता येणार असल्याची माहिती राष्ट्रपतींचे प्रचारप्रमुख वेणू राजामोनी यांनी दिली. भारतातील कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानातील मलाला युसुफजाई यांना मागील वर्षी १० डिसेंबर रोजी २०१४ करिता नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. बालमजुरीपासून मुलांना वाचविण्यासाठी स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्या सत्यार्थी यांनी, मी हे पदक देशाला दिले आहे. सगळ््या जगाचे लक्ष भारतावर केंद्रित झाले आहे. त्यामुळे मुलांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी बनली आहे असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी बालमजुरीचे निर्मूलन करण्याकरिता कायदा करण्याची मागणी केली. त्यांच्या बचपन बचाओ आंदोलन या संस्थेने आतापर्यंत ८३ हजार बाल मजुरांची सुटका केली आहे.
सत्यार्थींचे नोबेल राष्ट्रपती भवनात
By admin | Updated: January 7, 2015 23:54 IST