रस्त्यावर मंडप नाहीच ! -हायकोर्ट

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30

पान १....महत्त्वाची बातमी

No pavement on the road! -haycourt | रस्त्यावर मंडप नाहीच ! -हायकोर्ट

रस्त्यावर मंडप नाहीच ! -हायकोर्ट

न १....महत्त्वाची बातमी
..................................
रस्त्यावर मंडप नाहीच !
महापालिकेला हायकोर्टाची पुन्हा चपराक
आदेशाचे उल्लंघन करणार नाही, पालिकेची हमी
मुंबई: वाहतुकीला व पादचार्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच उत्सव मंडळांना परवानगी द्यावी, या न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, अशी लेखी हमी देण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात ओढावली. त्यामुळे यंदा मुंबईत रस्त्यावर उत्सव मंडळ दिसणार नाहीत. या आधी पालिकेने किमान यंदातरी रस्त्यावर मंडप उभारण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयात केली होती. त्यास न्यायालयाने नकार दिला होता.
गेल्या महिन्यात न्यायलायाने कान पिळल्यानंतर पालिकेने उत्सव मंडळांना मंडपांसाठी परवानगी देणारे धोरण आखले. या धोरणाची प्रत पालिकेने सोमवारी न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सादर केली. वाहतूक व पादचार्‍यांना मंडपांचा त्रास होत असल्यास त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग दिला जाईल, अशी तरतूद या धोरणात पालिकेने केली आहे. याकडे न्या. ओक यांनी पालिकेचे वकील अनिल साखरे यांचे लक्ष वेधले. ही तरतूद आम्ही दिलेल्या आदेशाच्या विरूद्ध असल्याचे ते म्हणाले.
वाहतुकीला व पादचार्‍यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश आम्ही दिले होते. तरीही पालिकेने रस्त्यावर मंडप उभारण्याचे व त्याने पादचार्‍यांना आणि वाहतुकीला त्रास झाल्यास पर्यायी मार्गिका देण्याची तयारी दाखवली, हे गैर आहे, असे न्यायालयाने सुनावले.
त्यावर तत्काळ न्यायालयात हजर असलेले पालिकेचे उपायुक्त आनंद वागराळकर यांनी खंडपीठाने मार्च महिन्यात दिलेल्या आदेशाचे पालन करूनच मंडपांना परवानगी दिली जाईल, अशी हमी ॲड. साखरे यांच्या मार्फत दिली. खंडपीठाने मार्च महिन्यात वरील आदेश दिले होते. त्यामुळे रस्त्यावर मंडपांसाठी स्वत:हून प्रयत्न करणार्‍या पालिकेला चांगलीच चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)
..................................................
(चौकट)
आवाज कमी ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची
उत्सवांचा आवाज कमी ठेवण्याची तयारी समाधानकारक
-उत्सवांमध्ये आवाज वाढल्यास त्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे करावी व या तक्रारीनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सोमवारी न्यायालयात सादर केले. आवाजाचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी १०० नंबरवर फोन करावा. पोलिसांनी याची निनावी तक्रार नोंदवावी. तसेच आवाजाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही? हे तपासून पुढे कारवाई करावी. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पिकर सुरू असल्यास तो तत्काळ बंद करावा. पोलिसांनी याची तक्रार न घेतल्यास डीसीपी किंवा अतिरिक्त पोलीस आयुक्त यंाच्याकडे ही तक्रार करता येईल, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. हे प्रतिज्ञापत्र समाधानकारक असल्याचे मत व्यक्त करत प्रत्येक उत्सवाच्या दोन दिवस आधी याची तरतुदीची जाहिरात करा, असे आदेश न्यायालयाने शासनाला दिले. यावरील अंतिम सुनावणी १२ ऑगस्टला होणार आहे.

Web Title: No pavement on the road! -haycourt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.