'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:34 IST2025-11-07T16:23:46+5:302025-11-07T16:34:06+5:30
पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अणु चाचणी संदर्भात चर्चा केली होती. यावर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान समोर आले. सिंह यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की भारत काय करेल हे भविष्यच सांगेल.

'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अणुचाचण्यांवरील विधाने आणि त्यावरून सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. कोणताही देश राष्ट्रीय सुरक्षेच्या किंवा अणुचाचण्यांच्या बाबतीत भारतावर दबाव आणू शकत नाही, अणुचाचण्यांच्या बाबतीत योग्य वेळी योग्य पाऊल उचलेल, असे स्पष्टच सिंह यांनी सांगितले. भारत अमेरिका किंवा चीन किंवा पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाच्या निर्देशानुसार किंवा दबावाखाली येणार नाही. भारत सरकार कोणताही निर्णय परकीय दबावाखाली नाही तर आपल्या राष्ट्रीय हिताचा विचार करून घेईल, असंही सिंह म्हणाले.
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याचा दावा फेटाळला. कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा सहभाग नव्हता, असे त्यांनी सांगितले. "भारत काय करेल हे भविष्यच सांगेल. अमेरिका किंवा पाकिस्तान जे करत आहे त्यामुळे भारतावर कोणताही दबाव येणार नाही. ते जे काही करायचे ते करू शकतात. आम्ही जे योग्य आणि योग्य वेळी करू."
तिसऱ्या पक्षाची भूमिका नाही
नियंत्रण रेषेवर भारताने इच्छित उद्दिष्टे साध्य केल्यानंतरच ही कारवाई रद्द करण्यात आली. सिंह म्हणाले, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की पाकिस्तानच्या डीजीएमओकडून युद्धबंदीसाठी वारंवार फोन येत होते. ते फोन कॉल्स मिळाल्यानंतर आणि आम्ही ठरवलेली उद्दिष्टे साध्य केल्यानंतरच आम्ही युद्धविरामची घोषणा केली."आवश्यक असल्यास आम्ही ऑपरेशन पुन्हा सुरू करू, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
"भारतीय सैन्य फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित करत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सैन्याने कधीही नागरी भागांना लक्ष्य केले नाही. यावेळी सिंह यांनी सीमापार हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या मृत्यूच्या पाकिस्तानच्या दाव्याचे खंडन केले. आम्ही फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे सिंह म्हणाले.