राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी जखमी भाजपा खासदार प्रताप सारंगी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सारंगी हे चांगला अभिनय करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संसदेतील धक्काबुक्की प्रकरणात पायऱ्यांवरून पडल्याने प्रताप सारंगी जखमी झाले होते. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा ही मागणी करत संसद भवन परिसरात विरोधक निदर्शने करत आहेत.
या आंदोलनात सहभागी झालेल्या जया बच्चन म्हणाल्या की, "आम्ही सर्वजण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण, या लोकांनी आम्हाला आत जाऊ दिलं नाही. पायऱ्यांवर हे सर्व लोक उभे होते. अशा स्थितीत जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या अंगावर पडली तर त्याच्या शेजारील व्यक्तीही खाली पडेल. मी एवढंच म्हणेन की ही सर्व फालतू नाटकं आहेत."
"सारंगीजी, राजपूतजी आणि नागालँडची महिला यांच्यापेक्षा कोणीही चांगला अभिनय करू शकत नाही. या तिघांपेक्षा आणखी चांगला अभिनय आतापर्यंत कोणी केलेला कधीच पाहिला नाही. हे सर्व लोक (भाजप नेते) पायऱ्यांवर उभे होते. आम्ही खाली उभे होतो. आम्ही वर जाण्याचा प्रयत्न करत होतो. मी म्हणेन की, अभिनयाशी संबंधित सर्व पुरस्कार या लोकांना दिले पाहिजेत."
"हे सर्व एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे होतं. हे लोक आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखत होतं, याची मी स्वतः साक्षीदार आहे. आम्ही संसदेत जाऊ नये म्हणून या लोकांनी आम्हाला धक्काबुक्की केली" असंही जया बच्चन यांनी म्हटलं आहे. संसदेत झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकशाही आणि संसदेच्या प्रतिष्ठेसाठी लाजिरवाणा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी राहुल गांधींवर भाजपा खासदारांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला.