no more Modi wave in big cities; Lokmat watch on 86 constituencies | मोठ्या शहरांमध्ये मोदी लाट नाहीच; ८६ मतदारसंघांंमधील पाहणी
मोठ्या शहरांमध्ये मोदी लाट नाहीच; ८६ मतदारसंघांंमधील पाहणी

- हरिश गुप्ता/नितीन आगरवाल 


नवी दिल्ली : मतदानाच्या सहाव्या टप्प्यापर्यंत (१२ मे) शहरी भागांत झालेले मतदान पाहता, यंदा निवडणुकीत मोदी लाट होती का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने २0१४ मध्ये शहरी भागांतील या ८६ पैकी ५५ जागांवर विजय मिळविला होता आणि तिथे भरघोस मतदान झाले होते. या सर्व ८६ मतदारसंघांमध्ये नेहमीपेक्षा २0 टक्के अधिक मतदान झाल्याचे आढळून आले होते.


‘लोकमत’च्या टीमने या ८६ मतदारसंघांतील २00९, २0१४ व २0१९ मध्ये झालेल्या मतदानाचा अभ्यास केला असता, यंदा वेगळे चित्र असल्याचे जाणवले. भरघोस मतदानाऐवजी यातील ४८ जागांवर खूपच कमी, तर ३८ ठिकाणी २0१४ इतकेच मतदान झाले. जिथे ५५ जागा जागा मिळविल्या होत्या, तिथेच त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे.


या ८६ पैकी ७ जागा राजधानी दिल्लीतील आहेत. त्यापैकी नवी दिल्ली मतदारसंघात मोदी व शहा यांनी सभा घेऊ नही ८.२६ टक्के कमी मतदान झाले. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मोदी यांच्या गुजरातमधील अहमदाबाद (पश्चिम), बडोदा, राजकोट, कर्नाटकातील उत्तर व मध्य बंगळुरू, झारखंडमधील धनबाद (जेथून कीर्ती आझाद काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत.), तसेच उत्तर प्रदेशातील सहारणपूर, बरेली, गाझियाबाद, झाशी, कानपूर या सर्व ठिकाणी मतदानाचे प्रमाण कमी आहे. याच ठिकाणी २00९च्या तुलनेत २0१४मध्ये प्रचंड मतदान झाले होते.


मध्य प्रदेश व राजस्थानातील शहरांमध्येही अधिक मतदान झाल्याचे दिसते. भोपाळमध्ये २00९ पेक्षा २0१४ मध्ये १३ टक्के अधिक मतदान झाले होते. यंदा तिथे ८ टक्के अधिक मतदान झाले असून, त्याचा फटका दिग्विजय सिंह यांना बसू शकतो आणि प्रज्ञा सिंह यांना फायदा मिळू शकतो, असा अर्थ लावला जात आहे.


नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका
नोटाबंदी व जीएसटीची वाईट पद्धतीने अंमलबजावणी यांचा फटका शहरी भागाला बसला आणि त्यामुळे मतदान कमी झाले, असे मानले जात आहे. कमी मतदानाचे विविध अर्थ लावले जात असले, तरी त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होतो, असा यंदा लावता येणार नाही. भाजपने जिंकलेल्या ५५ पैकी २७ मतदारसंघांत गेल्या वेळपेक्षा मतदानात किरकोळ वाढ झाल्याचे दिसते. आश्चर्य म्हणजे, त्यात मुंबईतील मतदारसंघही आहेत. अन्य महानगरांत मात्र हा उत्साह दिसलेला नाही. मुंबई व दिल्ली यांतील मतदानाच्या टक्क्यात हा फरक का, हा प्रश्नच आहे.


Web Title: no more Modi wave in big cities; Lokmat watch on 86 constituencies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.