ना चालक, ना गार्ड, ट्रेन धावली सुसाट... जम्मू-काश्मीरहून निघालेली मालगाडी ७० किमीनंतर पंजाबमध्ये थांबविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:58 IST2024-02-26T05:57:14+5:302024-02-26T05:58:22+5:30
दगडांनी भरलेली ५३ डब्यांच्या मालगाडीतून चालक हँडब्रेक न लावता खाली उतरला आणि चहा पिण्यासाठी गेला.

ना चालक, ना गार्ड, ट्रेन धावली सुसाट... जम्मू-काश्मीरहून निघालेली मालगाडी ७० किमीनंतर पंजाबमध्ये थांबविली
सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू: 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटात जळती रेल्वे कित्येक स्थानके पार करून जातानाचा थरार पाहिला असेल, असाच प्रकार जम्मू- काश्मीरच्या कठुआ स्थानकावर प्रत्यक्षात घडला. विशेष म्हणजे मालगाडीत ना चालक होता, ना गार्ड आणि वेग होता १०० किमी/तास.
दगडांनी भरलेली ५३ डब्यांच्या मालगाडीतून चालक हँडब्रेक न लावता खाली उतरला आणि चहा पिण्यासाठी गेला. उतारामुळे मालगाडी पुढे गेली. अधिकाऱ्यांचा पंजाबच्या सुजानपुर, पठाणकोट कैंट, कांदोरी, मिरथल, बांगला येथे गाडी थांबवण्याचा प्रयत्न फोल ठरला.
वाळूच्या गोण्यांनी थांबवली मालगाडी
मालगाडीने ७० किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर अखेर मुकेरियनमधील उची बस्सीजवळ वाळूच्या गोण्यांच्या मदतीने एका चढावाच्या ठिकाणी थांबवण्यात यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला, मार्गात कोणतीही गाडी न आल्याने जीवितहानी झाली नाही.
घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरु
■ आतापर्यंत चालक किंवा इतर कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
■ रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र ही मालगाडी ७० किलोमीटर चालकाविना धावल्याचा दावा केला. रेल्वे पोलिस (जालंधर) उपनिरीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले की, धावत्या रेल्वेची माहिती मिळाल्यावर जालंधर- पठाणकोट मार्गावरील सर्व रेल्वे फाटक सुरक्षित करण्यात आले.