IND Vs PAK Asia Cup Match: आशिया कप २०२५ ची सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना युएईविरोधात झाला, ज्यात भारताने मोठा विजय मिळवला. आता पुढील सामना १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरोधात होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी सातत्याने होत आहे. अशातच, शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आता हा सामना न खेळण्याचे आवाहन केले आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये एक कार्टून शेअर केले आहे. यामध्ये एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना सुरू असल्याचे दिसतेय, तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्याचे दृष्य आहे, ज्यात एक महिला आपल्या मृत पतीच्या बाजुला बसून रडतेय. पहलगाम हल्ल्याच्या या फोटोने संपूर्ण देश हादरला होता. हा फोटो नौदलातील लेफ्टनंट शहीद विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा होता. दहशतवाद्यांनी पहलगाम येथे विनय नरवाल यांना गोळ्या घालून मारले होते.
या फोटोसोबत प्रियंका लिहितात, 'कधीही विसरू नका, कधीही माफ करू नका. पाकिस्तानशी कोणताही सामना होऊ नये, ही देशाची भावना आहे.' दरम्यान, यापूर्वी त्यांनी राज्यसभेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामना रद्द करण्याची मागणी केली होती. यासोबतच, त्यांनी भारत सरकारला पत्र लिहून म्हटले होते की, जर सामना रद्द करता येत नसेल, तर त्याचे भारतात थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घालावी.
आम्ही हा सामना पाहणार नाही - आनंद दुबेशिवसेना (उबाठा) नेते आनंद दुबे यांनीही हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, भाजप पाकिस्तानच्या 'बी' टीमसारखी वागत आहे. सामना रद्द झाला नाही, तर आम्ही तर तो पाहणारच नाही. मात्र, हा सामना इतका आवश्यक का आहे ? पहलगाम हल्ल्यात महिलांचे सिंदूर नष्ट झाले. आजही त्याची आग शांत झालेली नाही. आपण १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी सामना खेळलो, तर यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.