No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 01:47 PM2018-07-19T13:47:59+5:302018-07-19T13:53:46+5:30

1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला लोकसभेत 269 सदस्यांनी पाठिंबा दिला तर त्यांच्या सरकारविरोधात 270 सदस्यांनी पाठिंबा दिला होता.

No Confidence Motion: ... Rajmata Vijayaraje Sindhiya was in tears when government failed | No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

googlenewsNext

नवी दिल्ली- राजकारण आणि सत्तेत कायम राहाणे या सतत बदलणाऱ्या गोष्टी आहेत. विशेषतः एखादे आघाडीचे सरकार पाच वर्षे कायम राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. विविध पक्षांना, विविध प्रांतातील विचारांना, नेत्यांना एकत्र घेऊन काम करणे अत्यंत कठिण काम असते. अटलबिहारी वाजपेयी यांनी आघाडीचे आव्हान स्विकारून सरकार स्थापन केले होते. मात्र 1999 मध्ये मात्र त्यांच्या सरकारला मोठ्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेत केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला होता.

जयललिता यांची भूमिका-
14 एप्रिल 1999 रोजी अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगितले. यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला विरोधकांच्या  अविश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यामध्ये बहुजन समाज पार्टीने अचानक सरकारविरोधात भूमिका घेतली. तर गिरिधर गमांग यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री असूनही मतदानाला येणे धक्कादायक होते. त्यातच नॅशनल कॉन्फरन्सच्या सैफुद्दिन सोझ यांनी रालोआ सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे वाजपेयी यांचे सरकार अल्पमतात आले.

एका मताने पराभव झाल्यावर-
अविश्वास दर्शक ठरावात सरकार केवळ एका मताने पराभूत झाल्यावर संपूर्ण लोकसभा काही क्षण स्तब्ध झाल्यासारखी झाली. वाजपेयी यांनी निकालाकडे एक नजर टाकून ते पीएम चेंबरच्या रुम नंबर 10 मध्ये आले. त्यांना पाहाताच राजमाता विजयाराजे सिंदिया यांना अश्रू आवरणे कठिण झाल्या आणि त्या रडू लागल्या. वाजपेयी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस त्यांनाही अत्यंत दुःख झाले. आपण पराभूत झालो, केवळ एका मताने पराभूत झालो असे शब्द त्यांनी अडवाणी यांना उद्देशून उच्चारले. राजमाता सिंदिया या ग्वाल्हेर घराण्याच्या महाराणी आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून प्रत्येक वाटचालीत त्यांचा सहभाग होता. भाजपाच्या प्रदीर्घ काळ उपाध्यक्षही होत्या. त्यामुळेच पक्षाचे सरकार केवळ एका मताने पराभूत होणे त्यांना सहन झाले नाही. सरकारच्या बाजूने 269 तर सरकारविरोधात 270 मते पडली होती.

निकालानंतर-
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झालेले नाहीत असे लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी बहुजन समाज पक्षाने सरकारविरोधात भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. जर समान मते पडली असती तर सभापतींना आपले निर्णायक मत देता आले असते असे मत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले होते.


 

Web Title: No Confidence Motion: ... Rajmata Vijayaraje Sindhiya was in tears when government failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.