लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील तांत्रिक बिघाडाचा केंद्र सरकारने पुन्हा आढावा घ्यावा तसेच या चौकशीत संबंधित विषयातील तज्ज्ञांचा समावेश करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) या संघटनेने गुरुवारी केली. १२ जून रोजी झालेल्या या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालाबाबत एफआयपीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एफआयपीने सांगितले की, या विमानाची दोन्ही इंजिन आपोआप बंद होण्याची शक्यता ज्यामुळे उद्भवली असती त्या तांत्रिक गोष्टींचा एएआयबीच्या अहवालात नीट विचार केलेला नाही. ही गोष्ट एफपीआयने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून कळविली आहे. त्यात म्हटले आहे की, अहमदाबाद येथे विमानाला झालेल्या अपघाताबद्दलचा प्राथमिक अहवाल वेळेत सादर केला ही उत्तम गोष्ट झाली. मात्र या विमानातील पायलटच्या काय चुका झाल्या असाव्यात याचा कोणत्याही ठोस पुराव्याविना एएआयबीने अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
एफआयपीने म्हटले आहे की, बोईंग विमानाच्या प्रणालीमध्ये दोष असतानाही त्याचे खापर पायलटवर फोडण्यात आल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. अहमदाबाद विमान अपघातात पायलटची चूक असल्याचे आडमार्गाने सुचविणे हे अयोग्य आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने काढले जाऊ शकतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर तसेच टीसीएमए, इइसी, एफएडीइसी या प्रणालींमधील तांत्रिक बिघाडांचा आढावा घेण्याची मागणी या संघटनेने केली आहे.
‘विमान कर्मचाऱ्यांवर निराधार आरोप नको’एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही निराधार आरोप करू नयेत असे एअरलाइन पायलट्स असोसिएशन-इंडिया (अल्पा-इंडिया) या पायलटच्या संघटनेने गुरुवारी म्हटले आहे. अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताबाबत कोणतेही ठोस पुरावे नसताना पायलटना जबाबदार धरू नये, असेही पायलटच्या संघटनांचे मत आहे.
स्टॅबिलायझरमधील बिघाडाचीही चौकशी करा’अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या चौकशीत स्टॅबिलायझरमधील संभाव्य बिघाडाचाही विचार व्हावा, असे विमानतज्ज्ञ कॅप्टन एहसान खालिद यांनी म्हटले आहे. रेकॉर्डरमधील स्टॅबिलायझरशी संबंधित माहिती तपासली पाहिजे. कारण दुरुस्ती नीट न झाल्यामुळे अपघात झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.