Nityanand Kailasa UN: फरारी नित्यानंदची प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांत; स्वयंघोषित देश कैलासाला मान्यता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:05 IST2023-02-28T13:05:23+5:302023-02-28T13:05:57+5:30
लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली नित्यानंदाला एक फरारी घोषित केले गेलेले आहे. यामुळे आता युएनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

Nityanand Kailasa UN: फरारी नित्यानंदची प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांत; स्वयंघोषित देश कैलासाला मान्यता?
जिनेवामधील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताविरोधात गरळ ओकणारा आणखी एक प्रदेश आला आहे. हा प्रदेश दुसरा तिसरा कोणाचा नसून बलात्कारातील आरोपी आणि स्वत:ला देव समजणाऱ्या फरारी नित्यानंदद्वारे स्थापित करण्यात आलेला काल्पनिक देश कैलासा आहे. भारतासाठी धक्कादायक बाब म्हणजे कैलासाच्या प्रतिनिधीला युएनच्या बैठकीत सहभागी करून घेण्यात आले.
यामध्ये त्याच्या प्रतिनिधीने नित्यानंद हा 'हिंदू धर्मातील सर्वोच्च गुरु' असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताकडून त्याला त्रास दिला जात असून संयुक्त राष्ट्रांनी त्याला सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे.
विजयप्रिया नित्यानंद नावाची महिला युएनच्या सभेत सहभागी झाली होती. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क (सीईएसआर) च्या 19 व्या बैठकीस ती हजर होती. युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासाचा संस्थापक नित्यानंदला भारत त्रास देत आहे. कैलासा हे हिंदू धर्माचे पहिले सार्वभौम राज्य असल्याचा दावा तिने केला आहे. या देशाच्या २० लाख स्थलांतरीत हिंदू आणि नित्यानंदचा भारताकडून होत असलेला छळ थांबवावा असे तिने म्हटले आहे.
नित्यानंदच्या या देशाने इतर देशांमध्ये दूतावास आणि स्वयंसेवी संस्था स्थापन केल्याचा दावा तिने केला. असे असले तरी संयुक्त राष्ट्रांनी कैलासाला मान्यता दिली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. जर मान्यता दिली गेली असेल तर या काल्पनिक देशाच्या राजाला कोणच्या पद्धतीने मान्यता दिली गेली? लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली नित्यानंदाला एक फरारी घोषित केले गेलेले आहे. यामुळे आता युएनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.