पाटणा : एकेकाळी मोठ्या विश्वासाने नितीशकुमार यांनी ज्यांच्याकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोपविली, त्या जीतनराम मांझी यांना आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेतील आंबे आणि लिचीची फळे तोडायला मनाई करण्यात आली आहे. बंडाचा झेंडा उगारणाऱ्या मांझी यांच्यावर नितीशकुमार यांच्या पडलेल्या वक्रदृष्टीचे हे फळ मानले जाते. मांझी यांनी दलित असल्यामुळेच अशी वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करीत नवा वाद छेडला आहे.फेब्रुवारीमध्ये मांझींच्या बंडाच्या राजकारणाने बिहार ढवळून निघाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले, त्यानंतर त्यांनी हिंदुस्तानी अवाम मोर्चा (एचएएम) हा पक्ष स्थापन करीत वेगळे बस्तान मांडले असले तरी १ अणे मार्ग हा मुख्यमंत्र्यासाठीचा बंगला सोडलेला नाही. पुन्हा मुख्यमंत्री बनलेले नितीशकुमार ७ सर्क्युलर रोड येथील बंगल्यात वास्तव्याला आहेत. १ अणे मार्ग बंगल्यातील शेकडो आंब्याच्या आणि लिचीच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी नितीशकुमार यांनी २४ पोलिसांना तैनात केले आहे. त्यात ८ उपनिरीक्षक आणि १६ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. झाडावरून पडलेले फळही मांझीकडे जाऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. मांझींना फळे तोडण्याला मनाई करण्यात आल्याची माहिती त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी एका निवेदनात देताच टीव्ही वाहिन्यांनीही ‘अवाम की नही आम की चिंता’ अशी ब्रेकिंग न्यूज बनविली आहे. दरम्यान, मांझी यांना कधीही फळे तोडण्यापासून रोखले नाही, असा खुलासा बिहार पोलिसांनी केला आहे. (वृत्तसंस्था)जमिनीवर पडलेले फळही कुणाला नेऊ देऊ नये अशी आम्हाला सूचना असल्याचे मांझी यांच्या निवासस्थानी तैनात पोलिसांनी स्पष्ट केले असून त्यांनी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानल्याचे त्यांच्या कर्तव्यदक्षतेतून दिसून येत आहे. रिझवान यांनी फळे तोडण्याला मनाई हा दलितांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राजद आणि भाजपला नितीशकुमार सरकारवर हल्ला करण्याची संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना फळे तोडण्यास मनाई करण्यात आली असून त्यातून नितीशकुमार यांची मूळ मानसिकताच दिसून येत असल्याचा आरोप मांझी यांनी केला आहे. एखादी व्यक्ती वास्तव्याला असलेल्या घराच्या परिसरातील झाडांची फळे तोडू शकत नसेल तर हा प्रकार विचित्रच म्हणावा लागेल. माझ्या कुटुंबीयांना फळे देणाऱ्या एका माळ्याला अलीकडेच निलंबित करण्यात आले आहे, अशी माहितीही मांझी यांनी दिली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी २००५ मध्ये सत्ता गमावल्यानंतर यादव दाम्पत्याने सहा महिने हा बंगला सोडला नव्हता त्यावेळी मात्र नितीशकुमार यांनी असा आदेश दिला नव्हता. नितीशकुमार यांनी मी दलित असल्यामुळे दुबळा आहे असे समजून माझा अशा पातळीवर अपमान केला आहे, असेही मांझी म्हणाले.बंगल्यात वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला फळे तोडू न देणे हा प्रकार अजब आहे. नितीशकुमार यांच्याविरुद्ध बंडाचे धाडस केल्यामुळेच महादलित असलेल्या मांझी यांचा अपमान केला जात आहे, असे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले. दरम्यान या आरोपांबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी हसत हसत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.हे अतिशय हीन राजकारण झाले. मी वृत्तपत्रांमध्ये वाचल्यानंतर पोलीस प्रमुख पी.के. ठाकूर यांच्याकडून संपूर्ण तपशील मागितला आहे. मला आधीच कळले असते तर मी सर्व फळे मागून घेतली असती आणि ती मांझींना दिली असती, असा टोलाही त्यांनी मारला. मुख्यमंत्र्यासारख्या व्हीआयपींची सुरक्षा विशेष सुरक्षा गटाकडे(एसएसजी) सोपविण्यात आली असून याप्रकरणी माहिती मिळविण्यात येत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
नितीशकुमार यांचे आंबे मांझींसाठी आंबट
By admin | Updated: June 4, 2015 23:37 IST