नितीन गडकरींनी फेटाळले हेरगिरीचे वृत्त
By Admin | Updated: July 27, 2014 16:00 IST2014-07-27T16:00:48+5:302014-07-27T16:00:48+5:30
दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आवाज रेकॉर्ड करणारी अत्याधूनिक उपकरणे आढळल्याचे वृत्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी फेटाळले आहे.

नितीन गडकरींनी फेटाळले हेरगिरीचे वृत्त
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आवाज रेकॉर्ड करणारी अत्याधूनिक उपकरणे आढळल्याचे वृत्त गडकरींनी फेटाळले आहे. हे वृत्त संपूर्णतः काल्पनिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तीन मूर्ती लेन येथील सरकारी निवासस्थानातील बेडरुममध्ये आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणे आढळल्याचे वृत्त रविवारी समोर आले होते. या अत्याधूनिक उपकरणांचा वापर अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि नॅशनल सेक्युरीटी एजन्सी या दोन संस्थाच करत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुऴे अमेरिकेने आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची हेरगिरी करत असल्याची चर्चा दिल्लीत रंगली होती. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांच्या हेरगिरीची पोलखोल करणा-या एडवर्ड स्नोडेनने अमेरिकेच्या यंत्रणा भाजपवर नजर ठेवतात असा गौप्यस्फोट केला असतानाच हे वृत्त धडकल्याने खळबळ माजली होती.
अखेरीस गडकरींनी ट्विटर या प्रकरणावर भाष्य केले. 'काही प्रसारमाध्यमांमध्ये माझ्या घरात रेकॉर्डींग उपकरणे आढळल्याचे वृत्त दाखवले जात आहे. पण हे वृत्त पूर्णपणे काल्पनिक आहे' असे ट्विट नितीन गडकरींनी केले आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.