‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:16 IST2025-07-27T06:16:05+5:302025-07-27T06:16:30+5:30
ही महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणजे इस्रो आणि नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधील दशकभर चाललेल्या सखोल तांत्रिक सहकार्याचे फलित आहे.

‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
तिरुचिरापल्ली: इस्रो आणि नासा या दोन प्रमुख अंतराळ संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित होत असलेली ‘निसार’ मोहीम ही संपूर्ण जगासाठी पृथ्वी निरीक्षण आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोलाची ठरणार असल्याचे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी शनिवारी स्पष्ट केले.
ही महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणजे इस्रो आणि नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधील दशकभर चाललेल्या सखोल तांत्रिक सहकार्याचे फलित आहे. ‘निसार’ मोहीम अनेक बाबतीत पहिल्यांदाच घडणारी आहे. ३० जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी ‘निसार’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
‘निसार’ उपग्रहाची वैशिष्ट्ये
वजन : २३९२ किलो
डेटा संकलन : २४२ किमी रुंदीच्या क्षेत्रात
तंत्रज्ञान : अत्याधुनिक स्वीपसार (SweepSAR)
कार्यक्षमता : सर्व हवामानात, दिवस-रात्र निरीक्षण क्षमता
फ्रिक्वेन्सी : दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण