‘निर्भया’ची विटंबना!
By Admin | Updated: March 5, 2015 02:14 IST2015-03-05T02:14:50+5:302015-03-05T02:14:50+5:30
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील एका आरोपीच्या बीबीसीच्या प्रतिनिधीने तिहार तुरुंगात जाऊन घेतलेल्या मुलाखतीवरून बुधवारी संसदेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

‘निर्भया’ची विटंबना!
बीबीसीकडून बलात्काऱ्याची मुलाखत : संसदेत संताप, माहितीपटावर बंदी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील एका आरोपीच्या बीबीसीच्या प्रतिनिधीने तिहार तुरुंगात जाऊन घेतलेल्या मुलाखतीवरून बुधवारी संसदेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सरकारनेही बीबीसीचा हा माहितीपट ही देशासाठी अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे सांगून तोे कदापि प्रसारित होऊ देणार नाही, असे ठासून सांगितले़
मुळात तिहार तुरुंगात आरोपीच्या मुलाखतीची परवानगी देण्यात आलीच कशी,याबद्दल खुद्द गृहमंत्री राजनाथसिंग यांनीही आश्चर्य व्यक्त केले. सदस्यांनी आपसातील राजकीय मतभेद बाजूला सारून या प्रकरणाला कडाडून विरोध केल्यानंतर गृहमंत्र्यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली. आरोपीची मुलाखत असलेल्या माहितीपटाच्या चित्रीकरणास कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित झाला. हा वादग्रस्त माहितीपट भारतात कदापि प्रसारित होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली. यावर सदस्यांनी विदेशात जर हा माहितीपट प्रसारित झाल्यास काय, असा प्रश्न उपस्थित केला. यावर तो कुठेही प्रसारित होणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
परवानगी घेऊन मुलाखत
अशा गुन्ह्याच्या एका अध्ययनासाठी गृह मंत्रालयाच्या वतीने जुलै २०१३ मध्ये परवानगी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने एका विदेशी महिलेसह दोन पत्रकारांनी तिहार कारागृहात जाऊन मुलाखत घेतली होती. लिखित पूर्वपरवानगी घेणे आणि असंपादित फुटेज कारागृह अधिकाऱ्यांना दाखविण्याची अट घालण्यात आली होती.
नंतर कारागृह अधिकाऱ्यांनी ७ एप्रिल २०१४ रोजी याप्रकरणी माहितीपट निर्मात्यास कायदेशीर नोटीस पाठविली, तेव्हा त्यांना या मुलाखतीचे असंपादित फुटेज दाखविण्यात आले. त्यात आरोपीने अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचे दिसल्याने निर्मात्यास ही मुलाखत प्रसारित करू नका, असे सांगितले होते.
परवानगी देणाऱ्यावर कारवाई करा
च्काँग्रेसचे रंजित रंजन म्हणाले, की मुली रात्री घरातून बाहेर का पडतात, तसे कपडे का परिधान करतात, असे प्रश्न उपस्थित करून मुलींनाच जबाबदार ठरविण्याचा निर्लज्जपणा आरोपीने दाखविला आहे.
च्भाजपाच्या किरण खेर, मीनाक्षी लेखी यांनीही रोष जाहीर करून मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली. सेनेचे विनायक राऊत यांनी शिक्षा झालेल्या आरोपीच्या मुलाखतीची परवानगी देणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
च्माकपचे के.ए. संपत यांनी या माहितीपटात आरोपीच्या वकिलानेही बलात्कारासाठी महिलांनाच दोषी ठरवून भीषण गुन्ह्यातील आरोपींचेच समर्थन केले आहे, याकडे लक्ष वेधले.
‘बलात्कारी’ वक्तव्य !
निर्भयावर क्रूर अत्याचार करणाऱ्यांपैकी एक आरोपी मुकेश सिंगने रात्री बाहेर पडणाऱ्या महिलाच आमच्यासारख्यांना आकर्षित करतात, असे ‘बलात्कारी’ विधान केले.
कारागृहात कैद्यांची मुलाखत घेण्याची तरतूद असू शकते. परंतु ज्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने बलात्कारी ठरविले आहे, त्याच्या मुलाखतीची परवानगी दिली जावी, ही बाब आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गरज पडल्यास कैद्यांच्या मुलाखतीची परवानगी देणाऱ्या तरतुदीचा आढावा घेऊन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल.
- राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री
ब्रिटनमध्ये माहितीपट दाखविणारच
लंडन : दिल्लीतील ‘निर्भया’ सामूहिक बलात्कारावरील माहितीपट ( इंडियाज डॉटर) बीबीसी-४ वरून स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० ) ब्रिटनमध्ये प्रसारित करण्याचा निर्णय बीबीसीने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हा माहितीपट ८ मार्च रोजी प्रसारित करण्याचा बीबीसीने निर्णय घेतला होता.