एनआयए अधिकारी तंझील अहमद यांची हत्या नातेवाईकाने केल्याचं उघड
By Admin | Updated: April 8, 2016 13:27 IST2016-04-08T13:27:43+5:302016-04-08T13:27:43+5:30
एनआयए अधिकारी मोहम्मद तंझील अहमद यांच्या हत्येचा उलगडा झाला असून नातेवाईकानेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे

एनआयए अधिकारी तंझील अहमद यांची हत्या नातेवाईकाने केल्याचं उघड
>ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. ८ - एनआयए अधिकारी मोहम्मद तंझील अहमद यांच्या हत्येचा उलगडा झाला असून नातेवाईकानेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी तंझील अहमद यांचा नातेवाईक रेहान मोमहम्मदला गुरुवारी अटक केली होती. त्याची चौकशी केली असता आपणच ही हत्या केल्याचं त्याने कबूल केलं आहे. कुटुंबाचा वारंवार अपमान आणि छळवणूक केल्याने रागातून हत्या केल्याचं रेहानने पोलिसांना सांगितलं आहे.
रेहानने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हत्येमध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल तो चालवत होता तर त्याच्यासोबत मुनीर होता. ज्याने तंझील अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तंझील यांची गाडी थांबवून त्यांच्यावर २४ गोळया झाडण्यात आल्या होत्या. यातील २१ गोळ्या तंझील यांना लागल्या होत्या. 12 गोळ्या त्यांच्या शरिरात सापडल्या होत्या तर 9 गोळ्या आरपार गेल्या होत्या. यात तंझील यांचा जागीच मृत्यू झाला तर, त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती.
स्थानिक गुप्तचर यंत्रणांना दिलेल्या माहितीच्या आधाराव पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतलं होतं. रेहान हा तंझील यांच्या बहिणीच्या पतीचा पुतण्या आहे. तंझील अहमद संपत्तीत वाटा मिळावा यासाठी बहिणीच्या पतीचा वापर करत होता. तसंच माझ्या वडिलांचा, भावांचा अपमान करायचा. माझ्या अजोबांचाही एकदा अपमान केला होता असं रेहानने पोलीस चौकशीत सांगितलं आहे. दोन्ही आरोपींच्या मोबाईलचं लोकेशन घटनास्थळी आढळल्याने त्यांच्यावर संशय होता. जोपर्यंत आम्हाला सर्व पुरावे मिळत नाहीत तोपर्यत आम्ही लोकांसमोर जाहीर करणार नाही असं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.