‘एनआयए’कडून ‘इसिस’च्या हल्लेखोरांचा शोध
By Admin | Updated: December 16, 2014 04:54 IST2014-12-16T04:54:26+5:302014-12-16T04:54:26+5:30
आॅस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या ओलिस नाट्यानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचे संभाव्य हल्लेखोर भारतात आहेत

‘एनआयए’कडून ‘इसिस’च्या हल्लेखोरांचा शोध
डिप्पी वांकाणी, मुंबई
आॅस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या ओलिस नाट्यानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचे संभाव्य हल्लेखोर भारतात आहेत का, हे शोधून काढण्यात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) गर्क झाली आहे. या संघटनेसाठी काम करून इराकमधून परतलेल्या कल्याणच्या आरिफ माजिदने एनआयएला सांगितले होते की ही आयएस भारतातही आपल्या कारवाया करण्याच्या योजना बनवत असून त्यासाठी इच्छुक तरुणांना शोधत आहे.
जगातील ज्या भागांत आयएसची प्रत्यक्ष उपस्थिती नाही त्या ठिकाणी ते सोशल मीडिया किंवा वैयक्तिक संबंधांतून संभाव्य सदस्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संघटनेने आग्नेय आशियात कारवायांसाठी खास योजना बनवल्या असल्याचे माजिदने सांगितले होते. प्रत्यक्ष प्रभावक्षेत्राबाहेरील देशांत कमी मनुष्यबळावर आधारित योजना राबवण्यात येत आहेत.
सिडनी हल्ल्याप्रमाणे एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी एखाददुसऱ्या हल्लेखोराने जरी साध्या बंदुकांनिशी लोकांना ओलिस ठेवले तरीही त्यातून निर्माण होणारे नाट्य आणि थरार इतका मोठा असू शकतो की जगभरच्या नागरिकांचे तिकडे लक्ष वेधून घेता येते आणि दहशतवाद्यांना आपला इप्सित हेतू साधण्यात यश येते.
दरम्यान, राज्यात आणि शहरात असे हल्ले टाळण्यासाठी राज्य पोलिसांनी तातडीने संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.