रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:38 IST2025-12-22T06:38:47+5:302025-12-22T06:38:54+5:30
Indian Railway Fare Hike 2025 रेल्वे मंत्रालयाने मेल, एक्स्प्रेस आणि एसी कोचच्या भाड्यात १ ते २ पैसे प्रति किमी वाढ केली आहे. २६ डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होईल. पहा लोकल प्रवाशांवर काय परिणाम होणार?

रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनाचे बेत आखणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात प्रति किलोमीटर १ ते २ पैशांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ येत्या २६ डिसेंबर २०२५ पासून देशभर लागू होणार आहे. प्रामुख्याने मेल, एक्स्प्रेस आणि एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांना या दरवाढीचा फटका बसेल.
कोणाला किती फटका बसणार?
रेल्वेने जाहीर केलेल्या नव्या पत्रकानुसार, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागतील. विशेषतः 'एसी' (AC) श्रेणीतील प्रवासासाठी सर्वाधिक म्हणजेच २ पैसे प्रति किलोमीटर अशी वाढ करण्यात आली आहे. मेल आणि एक्स्प्रेसच्या नॉन-एसी (स्लीपर) श्रेणीसाठी १ पैसा प्रति किलोमीटर दरवाढ असेल.
लोकल प्रवाशांना मोठा दिलासा
या भाडेवाढीतून मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'लोकल'ला आणि उपनगरीय प्रवाशांना वगळण्यात आले आहे.
लोकल रेल्वे: मासिक सीझन पास (Pass) मध्ये कोणतीही वाढ नाही.
कमी अंतराचा प्रवास: सर्वसाधारण श्रेणीमध्ये पहिल्या २१५ किमी पर्यंत भाडे जैसे थे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि छोट्या प्रवासावर याचा परिणाम होणार नाही.
भाडेवाढीचे गणित: ६०० कोटींचा महसूल
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत रेल्वे मार्गांचा विस्तार आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या रेल्वेला मनुष्यबळावर १.१५ लाख कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. पेन्शन आणि वाढत्या देखभाल खर्चामुळे ही भाडेवाढ अनिवार्य असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या दरवाढीतून ३१ मार्च २०२६ पर्यंत सुमारे ६०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
| श्रेणी | प्रवासाचे अंतर | भाडेवाढ (प्रति किमी) |
| सर्वसाधारण (General) | ० ते २१५ किमी | काहीही नाही |
| सर्वसाधारण (General) | २१५ किमी पेक्षा जास्त | १ पैसा |
| मेल/एक्स्प्रेस (Non AC) | सर्व अंतर | १ पैसा |
| एसी कोच (AC Coaches) | सर्व अंतर | २ पैसे |