लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आता फक्त कागदोपत्री तक्रारी करत नाही, तर थेट निर्णायक कारवाई करतो. नवा भारत दहशतवाद संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने राजकीय व लष्करी उद्दिष्टांची पूर्तता केल्याने सध्या ही कारवाई काही काळासाठी स्थगित केली आहे. ती संपुष्टात आली आहे, असा कोणीही समज करून घेऊ नये. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली तर पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली. त्याच्या प्रारंभी ते म्हणाले की, भारतीय सैन्य नेहमीच सीमांच्या सुरक्षेसाठी सज्ज असते. ऑपरेशन सिंदूर ही अत्यंत प्रभावी आणि उत्तम समन्वय राखून केलेली कारवाई होती. ही मोहीम केवळ २२ मिनिटांत पूर्ण करण्यात आली आणि पहलगामच्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे सर्वाधिक नुकसान आणि निरपराध नागरिकांना काहीही इजा होणार नाही, याची खबरदारी घेत ही मोहीम पार पाडण्यात आली. ही कारवाई करताना भारतावर बाह्यशक्तींचा दबाव होता, असे सांगणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे हे चुकीचे आहे. पाकच्या लष्करी संचालनालयाच्या महासंचालकांनी हल्ला थांबविण्याची विनंती भारतीय समकक्ष अधिकाऱ्यांना केली होती, अशी माहितीही सिंह यांनी दिली. भारत व पाकमध्ये मी शस्त्रसंधी घडविण्याची मी मध्यस्थी केली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.
‘कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील’
पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानातून दहशतवादी आले हे कसे कळाले?, ही माहिती कशी मिळाली?, याबाबत माहिती देण्यास एनआयए तयार नाही. कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील. ते पाकिस्तानातून आले होते याचा कोणताही पुरावा नाही. मग हे तुम्ही कसे मान्य करीत आहात, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केल्याने वाद झाला.
‘युद्ध थांबविण्याची विनंती पाकिस्ताननेच केली’
लष्करी कारवाई थांबविण्याची विनंती पाककडून भारताला करण्यात आली. या संघर्षादरम्यान अमेरिकेशी भारताची जी चर्चा झाली त्यात कुठेही व्यापाराचा मुद्दा व ऑपरेशन सिंदूर यांचा परस्परसंबंध लावण्यात आला नव्हता. भारताने पाकविरोधात केलेल्या कारवाईला १९० देशांपैकी पाकिस्तानसहित फक्त तीन देशांनी विरोध केला, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले.