प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन ५० विमाने
By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30
विमान सेवेत कार्यरत कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षात नव्या ५० विमानांच्या खरेदीची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन ५० विमाने
मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत विमान प्रवासात झालेल्या घसघशीत वाढीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान सेवेत कार्यरत कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षात नव्या ५० विमानांच्या खरेदीची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय विमान कंपन्यांनी एकूण ३४ नवीन विमाने प्रवाशांच्या सेवेत रुजू केली. त्यानंतर यंदा हा आकडा १६ ने वाढत ५० वर पोहोचला आहे. ही नवीन विमाने उड्डाणासाठी सज्ज झाल्यास विमान प्रवाशांच्या संख्येत सध्याच्या तुलनेत किमान २० टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
इंडिया एअरलाईन (२४), गो एअर (८), स्पाईसजेट (६), विस्तारा (४), एअर एशिया इंडिया (२), एअर इंडिया (२) आणि अन्य काही कंपन्यांमार्फत ३ ते ४ विमाने दाखल करण्यात येतील. विशेष म्हणजे, या ५० विमानांपैकी बहुतांश विमाने ही एअरबस ए ३२० आणि बोर्इंग ७३७ अशी विस्तीर्ण आहेत. चालू महिनाअखेरीपासून ते आगामी जानेवारीपर्यंत यातील बहुतांश विमाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. विमान कंपन्यांच्या आणि विमानांच्या संख्येतही वाढ झाल्यामुळे विमान कंपन्यांमध्ये आपापसांत दरयुद्ध छेडले गेले आहे. या दरयुद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक विमान कंपन्यांनी आपल्या विविध मार्गांवरील तिकिटांची विक्री १ रुपया ते ५०० रुपये अशा दराने केली. यातही, वर्षभराच्या कालावधीत कधीही त्या तिकिटाद्वारे प्रवास करण्याची मुभा दिल्यामुळे अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यातच भारतात रेल्वेच्या प्रवासात गेल्या पाच वर्षांपासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने दरवाढ झाली आहे. यामुळे प्रथम वर्गाच्या प्रवासाचे दर आणि विमान प्रवासाचे दर यात फारसा फरक राहिलेला नाही. किंबहुना, काही वेळा विमान प्रवासाचे दर हे रेल्वेच्या प्रथम वर्गापेक्षाही स्वस्त असल्याचे आढळून आले आहे.
प्रवाशांची संख्या जरी वाढत असली तरी बिझनेस क्लासच्या तुलनेत इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत स्वस्तात विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांनी बिझनेस क्लासमधील जागांचे प्रमाण अतिशय कमी केले आहे.
ही नवीन विमाने सेवेत रुजू झाल्यानंतर देशांतर्गत विमान क्षेत्रातील घडामोडींना आणखी वेग येईल. याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारच्या नव्या धोरणानुसार अनेक शहरांतून विमानतळ, एअरस्ट्रीप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. यामुळे अनेक नवे हवाई मार्ग विकसित होतील, तसेच नव्या विमानांच्या खरेदीमुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमधील स्पर्धा आणखी तीव्र होईल. याचा अर्थातच लाभ तिकीटदरांच्या स्वस्ताईने प्रवाशांच्या पथ्यावर पडेल, असे विश्लेषण या क्षेत्राचे अभ्यासक संदीप धनेश्वर यांनी केले. (प्रतिनिधी)
>२०१५ च्या वर्षात देशांतर्गत विमान सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. उपलब्ध माहितीनुसार, तब्बल आठ कोटी १० लाख लोकांनी विमान प्रवासाला पसंती दिली.
वर्षभराच्या कालावधीत देशातील विमान सेवांच्या क्षमतेच्या सरासरी ८३ टक्के विमाने लोकांनी भरलेली होती. अमेरिकेत देशांतर्गत प्रवासाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.