Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत निधन झाले. 28 डिसेंबर रोजी त्यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आता त्यांच्या समाधीस्थळावरुन नवा वाद सुरू झाला आहे. या वादावरुन माजी पंतप्रधान दिवंगत पीव्ही नरसिंह राव यांचे भाऊ मनोहर राव, यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने नरसिंहरावांना किती मान दिला?मीडियाशी संवाद साधताना मनोहर राव म्हणतात, "काँग्रेसने 20 वर्षे मागे वळून पाहावे. त्यांनी पीव्ही नरसिंह रावांना किती आदर दिला? काँग्रेसने नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी जमीन दिली नाही, त्यांचा एक पुतळाही कधी बांधला नाही, त्यांना भारतरत्नही दिला नाही. काँग्रेसने तर नरसिंह राव यांचे पार्थिव ठेवण्यासाठी पक्ष कार्यालयाचे कुलूपही उघडले नव्हते. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान...संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. मात्र नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही आले नाही. सोनिया गांधी एआयसीसीच्या अध्यक्षा होत्या. त्या हैदराबादला आल्या नाही," अशी टीका त्यांनी केली.
मनमोहन सरकारमध्ये नरसिंह राव यांना काय मिळाले?मनोहर राव पुढे म्हणतात, "डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या कार्यकाळात खूप प्रसिद्धी मिळाली, कारण नरसिंह राव यांनी त्यांना अर्थमंत्री म्हणून काम करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. या काळात मनमोहन सिंग यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. देशाला आर्थिक संकटातून वाचवले. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची जोडी गुरु-शिष्याची जोडी होती. पण, मनमोहन सरकारमध्ये नरसिंह राव यांना काय मिळाले?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजप मनमोहन सिंग यांचा आदर करेल"मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनात संवेदना आहेत. त्यांच्या स्मारकासाठी भाजप नक्कीच जमीन देईल. काही औपचारिकता आहेत, ज्या काँग्रेसने पूर्ण केल्या पाहिजेत," असेही त्यांनी यावेळी म्हटले.