लाल किल्ल्यात नेलेला डमी बॉम्ब पोलिसांना सापडलाच नाही; ७ जण निलंबित, सुरक्षेत मोठी चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:04 IST2025-08-05T11:57:04+5:302025-08-05T12:04:47+5:30
लाल किल्ल्यावरील सुरक्षा कवायतीत निष्काळजीपणा केल्याबद्दल ७ पोलिसांना निलंबित करण्यात आलं.

लाल किल्ल्यात नेलेला डमी बॉम्ब पोलिसांना सापडलाच नाही; ७ जण निलंबित, सुरक्षेत मोठी चूक
Red Fort Security Glitch: स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना डमी बॉम्ब शोधता आली नाही. त्यामुळे लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे या सर्वांना निलंबित करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
२ ऑगस्ट रोजी हा सगळा प्रकार घडला. दिल्ली पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला लक्षात घेऊन दिल्ली पोलिस दररोज सिक्युरिटी ड्रिल घेत होते. शनिवारी, विशेष कक्षाच्या पथकाने असाच एक ड्रिल घेतला. पथकाने लाल किल्ल्याच्या परिसरात साध्या पोशाखात प्रवेश केला आणि सोबत एक डमी बॉम्ब घेतला. या दरम्यान, तिथे तैनात असलेल्या पोलिसांना डमी बॉम्ब शोधता आला नाही. ही सुरक्षेतील एक मोठी चूक होती. यामुळे त्यांना ७ पोलिसांना निलंबित करण्यात आले.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलीस दररोज सराव करतात. शनिवारी साध्या वेशात विशेष कक्षाची एक टीम मॉक ड्रिलसाठी आली. ते लाल किल्ल्यात बनावट बॉम्ब घेऊन घुसले. त्यावेळी लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना बॉम्ब सापडला नाही. सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांना निलंबित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. यामध्ये पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतात.
स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या आधी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून दिल्ली पोलीस आयुक्त एसबीके सिंह यांनी २ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान लाल किल्ला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित केलाय. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत पॅरा-ग्लायडर, पॅरा-मोटर्स, हँग-ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाईट विमान, रिमोट-कंट्रोल्ड विमान, हॉट एअर फुगे, लहान आकाराचे विमान या भागात उडवण्यास मनाई आहे.
7 police personnel, including constables and head constables, deployed for the security of the Red Fort, have been suspended due to negligence in security. The Delhi Police conducts daily drills as part of preparations for the program scheduled for 15th August. A team of the…
— ANI (@ANI) August 4, 2025
दरम्यान, यावेळी दिल्ली पोलिसांच्या श्वान पथकाने स्वातंत्र्य दिनानिमित्त स्निफर श्वानांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. २७ जुलै रोजी, पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक जितेंद्र डोग्रा म्हणाले होते की, श्वानांना आता स्फोटके आढळल्यास शांतपणे प्रतिक्रिया देण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, जसे की त्यांची शेपटी हलवणे किंवा त्यांच्या हाताकडे पाहणे. कारण काही प्रकारचे स्फोटके भुंकण्यासारख्या मोठ्या आवाजाने देखील सुरु होतात.