नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 22:13 IST2025-06-14T22:12:56+5:302025-06-14T22:13:15+5:30
NEET-UG result, MBBS Admission: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एकूण २२.७६ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते

नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
आज नीट-युजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राजस्थानचा महेश कुमार पहिला तर इंदूरचा उत्कर्ष अवधिया दुसला आला आहे. महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा आला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एकूण २२.७६ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते, तर सुमारे २०.८ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते आणि सुमारे १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा ४ मे रोजी घेण्यात आली होती. गेल्या वर्षी १३.१५ लाख विद्यार्थी पात्र ठरले होते. मृणाल किशोर झा याची चौथी रँक आली आहे.
उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक १.७० लाखांहून अधिक विद्यार्थी पास झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर आहे. राज्यातून १.२५ लाखांहून अधिक विद्यार्थी पास झाले आहेत. राजस्थान १.१९ लाख पात्र विद्यार्थ्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पात्र विद्यार्थ्यांमध्ये ७.२ लाखांहून अधिक मुली आहेत, तर ५.१४ लाखांहून अधिक पुरुष आहेत. तसेच यामध्ये ५२९ पात्र विद्यार्थी हे परदेशी नागरिक आहेत, ४०५ अनिवासी भारतीय आहेत आणि ६०६ ओसीआय कार्डधारक आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी NTA दरवर्षी नीट परीक्षा घेते. या परीक्षेत घोटाळे देखील झालेले आहेत. गेल्या वर्षी नीटवर पेपर लीक आणि खटल्यांसह अनेक अनियमिततांमुळे वादग्रस्त ठरली होती. देशात MBSS अभ्यासक्रमासाठी एकूण १,०८,००० जागा उपलब्ध आहेत, यापैकी सरकारी रुग्णालयांमध्ये ५६,००० तर खाजगी महाविद्यालयांमध्ये ५२,००० जागा आहेत. यामुळे आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.
परदेशातही होती परीक्षा...
भारतातील ५५२ शहरांमध्ये आणि इतर देशांतील १४ शहरांमध्ये असलेल्या ५,४६८ केंद्रांवर एनईईटी आयोजित करण्यात आली होती. अबू धाबी, दुबई, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, कुवेत, लागोस, कौलालंपूर, मनामा, मस्कत, रियाध, शारजाह आणि सिंगापूर या ठिकाणी या परीक्षा घेण्यात आली.