परीक्षेचा निकाल लागण्याआधीच कामगिरीने निराश; NEET च्या विद्यार्थ्याने बंदुकीने स्वतःवर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:32 IST2025-06-05T12:25:14+5:302025-06-05T12:32:34+5:30
नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला आहे.

परीक्षेचा निकाल लागण्याआधीच कामगिरीने निराश; NEET च्या विद्यार्थ्याने बंदुकीने स्वतःवर झाडली गोळी
NEET Candidate: नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट या महत्त्वाच्या परीक्षेची उत्तरतालिका नुकतीच जाहीर करण्यात आलीय. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक अतिशय अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. ग्वाल्हेर शहरातील एका १८ वर्षीय नीट परीक्षेच्या उमेदवाराने उत्तरतालिकेतील कामगिरीमुळे निराश होऊन आत्महत्या केली. मुख्य परीक्षेचा निकाल अजून लागलेला नाही. मात्र त्याआधीच या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले.
ग्वाल्हेर शहरातील महाराजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दी पुरम भागातून ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एका नीटच्या विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून करून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी विद्यार्थ्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताचे नाव निखिल प्रताप राठोड असे आहे. निखिल निवृत्त सैनिक बृजभान सिंग राठोड यांचा मुलगा होता. निखिल वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. निखिलने त्याच्या वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडली. निखिलला त्याच्या अभ्यासात नेहमीच मदत करणाऱ्या कुटुंबाला या अचानक घडलेल्या घटनेने जबर धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिलने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत भाग घेतला होता. त्याने परीक्षेची नुकतीच प्रसिद्ध झालेली उत्तरपत्रिका पाहिली होती. त्यात त्याचे गुण अपेक्षेपेक्षा खूपच कमी होते. यामुळे तो खूप तणावाखाली होता आणि त्यातूनच त्याने बुधवारी रात्री आत्महत्या केली. जेव्हा त्याच्या पालकांनी त्याला त्याच्या गुणांबद्दल विचारले तेव्हा निखिलने त्याच्या उत्तरपत्रिकांची तुलना मुख्य उत्तरतालिकेशी केली. त्याला अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळत होते.
उत्तरतालिका पाहिल्यानंतर निखिल अचानक घराच्या खालच्या खोलीत गेला. तिथे त्याने त्याच्या वडिलांची परवानाधारक पिस्तूल उचलली आणि स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य खाली धावत गेले तेव्हा त्यांना निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घरच्यांनी त्याला त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर महाराजपुरा पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, निखिल काही काळापासून खूप दुःखी आणि शांत होता. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्याच्या मानसिक स्थितीत बदल दिसून आला होता. पण तो असं पाऊल उचलेल याची त्यांनाही कल्पना नव्हती. पोलिसांनी चौकशीसाठी फॉरेन्सिक टीमला बोलावले आहे. आत्महत्येमागील खरे कारण स्पष्ट करण्यासाठी निखिलच्या मित्रांची आणि कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी केली जात आहे.