एकदा पाकिस्तानसोबत आरपारची लढाई झालीच पाहिजे - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:48 IST2018-02-07T13:47:04+5:302018-02-07T13:48:42+5:30
पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावर बोलताना आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एकदा तरी पाकिस्तानसोबत आरपार लढाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे

एकदा पाकिस्तानसोबत आरपारची लढाई झालीच पाहिजे - रामदास आठवले
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावर बोलताना आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एकदा तरी पाकिस्तानसोबत आरपार लढाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानी लष्कराने राजौरी व पूंछ जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात चार जवानांना वीरमरण आल्याच्या वृत्ताने देशभर संतापाची लाट उसळली असून, पाकला आता जोरदार अद्दल घडवा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असताना भारताने गप्प न बसता, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी व पाक सैनिक यांचे अड्डे व बंकर्स संपवून टाकावेत, अशी चर्चा सामान्यांमध्येही सुरू होती. सोमवारी बीएसएफचा एक अधिकारीही पाकच्या हल्ल्यात जखमी झाला.
'मला वाटतं पाकिस्तानसोबत एकदा आरपार लढाई झाली पाहिजे. आम्ही मैत्री करण्यास इच्छुक आहोत. पण एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे', असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
Pakistan violates ceasefire many times. Mujhe lagta hai ki ek baar Pakistan ke saath aar-paar ki ladai honi chahiye. Hum dosti karna chahte hain. Ek baar Pakistan ko sabak sikhana chahiye: Union Minister Ramdas Athawale in Delhi pic.twitter.com/LvDsiWRIsm
— ANI (@ANI) February 7, 2018
पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे सीमा रेषा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील २४ गावे पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत, तसेच ८४ शाळाही ३ दिवसांपासून बंद आहेत. हल्ल्याच्या भीतीने लोकांचे स्थलांतर सुरू असून, पाकला त्यांच्या घरात घुसून संपवा, अशी मागणी स्थानिकही करीत आहेत. आतापर्यंत ९0 स्थानिक पाकच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि भारतीय सैन्यदलाचे उपप्रमुख ले. जनरल शरत चंद यांनी आम्ही गप्प बसणार नाही आणि पाकला धडा शिकवू, असा इशारा दिला आहे. ले. जनरल शरत चंद म्हणाले की, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. बदला न सांगता घेतला जात असतो. आम्ही अधिक बोलणार नाही. आमची कारवाईच काय ते बोलेल. अतिरेक्यांच्या घुसखोरीला पाकिस्तानी सैन्याची फूस असल्याचे सांगून, ते म्हणाले की, पाकिस्तानला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत, ‘भारतीय सैन्याच्या शौर्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.’
जवानांचे पार्थिव घरी
पाकिस्तानने काल केलेल्या हल्ल्यात जे जवान शहीद झाले, त्यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या घरी पाठविण्यात आले. २ जवान काश्मीरच्या कठुआ व सांबा येथील होते, तर १ जवान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा होता. कॅप्टन कपिल कुंडू यांचे पार्थिव दिल्लीला आणून तेथून गुरगावला नेण्यात आले. दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व लष्करप्रमुखांनी विमानतळावर पार्थिवाचे दर्शन घेतले व त्यांना आदरांजली वाहिली.