राष्ट्रपतीपदासाठी एनडीएची एकजूट!

By Admin | Updated: April 11, 2017 04:45 IST2017-04-11T04:45:24+5:302017-04-11T04:45:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजधानीतील निवासस्थानी बोलाविलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेनेसह ३२ घटक पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने सत्ताधारी

NDA united for President | राष्ट्रपतीपदासाठी एनडीएची एकजूट!

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएची एकजूट!

- हरिश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजधानीतील निवासस्थानी बोलाविलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेनेसह ३२ घटक पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने सत्ताधारी आघाडी आजही एकत्र असल्याचा संदेश गेला. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली असताना सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा भाजपाचा हेतू बैठकीमुळे साध्य झाला.
पुढील म्हणजे २०१९ची निवडणूकही मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नंतर सांगितले. सतत राज्य व केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला हजर होते. जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या आणि आॅगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या पसंतीचे उमेदवार उभे करून निवडून आणायचे असून, त्यासाठी मतैक्य घडवून आणणे भाजपासाठी गरजेचे आहे. त्याबाबत बैठकीत थेट चर्चा झाली नसली तरी त्यादृष्टीने पडलेले हे पहिले पाऊल होते. अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हेही बैठकीसाठी आले होते.

यंदा तसे नको
पूर्वी शिवसेना व जनता दल (संयुक्त) रालोआचे घटक होते. तरीही या दोघांनी दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत केली नव्हती. शिवसेनेने प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. यंदा शिवसेनेने वा कोणत्याच घटक पक्षाने असे करू नये, अशी भाजपाची इच्छा आहे. त्यामुळेच खा. रवींद्र गायकवाड विमानबंदीवरून शिवसेनेमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात आली.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची रष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची ही सर्वांत मोठी बैठक होती, असे म्हणता येईल, कारण सर्व घटक पक्षांचे नेते बैठकीला हजर होते. सत्तेत नसलेले, पण भाजपासमवेत राज्यात एकत्र असणारे पक्षांचे नेतेही बैठकीला आले होते.

Web Title: NDA united for President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.