अप्पारावच्या एन्काउंटरने घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी कट रचला; जवानांनी धोकादायक प्लॅन उधळून लावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 21:02 IST2025-01-23T21:00:42+5:302025-01-23T21:02:02+5:30
नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये एक मोठा कट रचला होता. जवानांनी त्यांचा प्लॅन हाणून पाडला आहे.

अप्पारावच्या एन्काउंटरने घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी कट रचला; जवानांनी धोकादायक प्लॅन उधळून लावला
काही दिवसापूर्वी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये जवानांनी नक्षलवाद्याविरोधात मोठी कारवा केली. या कारवाईमध्ये सुरक्षा दलांनी अनेक नक्षलवाद्यांना ठार मारले, यात एका कट्टर नक्षलवादीचाही समावेश होता. या नक्षलवादीची ओळख जयराम उर्फ अप्पाराव अशी झाली आहे. या नक्षलवाद्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. जयराम हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये एक मोठा कट रचला होता, हा कट आता जवानांनी उधळून लावला आहे.
१६ लाख रोजगार, १५ लाख कोटींची गुंतवणूक; दावोस दौऱ्याने महाराष्ट्राला काय काय दिलं?
जवानांच्या सतर्कतेमुळे बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात आला. बासगुडा आणि अवपल्ली रस्त्यावर खाणकाम करण्यासाठी गेलेल्या पथकाला वेळीच बॉम्ब सापडला. मायनिंग पथकाने बॉम्ब घटनास्थळीच निकामी करून मोठी दुर्घटना टळली. केंद्रीय राखीव पोलीस दलाची १६८ वी BDS टीम आज नियमित शोध मोहिमेवर गेली होती.
बासगुडा आणि अवपल्ली रस्त्यावर तिमापूरजवळ एक दुर्गा मंदिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराजवळील पुलाखाली नक्षलवाद्यांनी बॉम्ब ठेवला होता. बीडीएस टीम पुलावर पोहोचताच त्यांना मेटल डिटेक्टरमध्ये ५० किलो आयईडीचा सिग्नल मिळाला. बीडीएस टीमला बॉम्बची माहिती तात्काळ देण्यात आली आणि ते घटनास्थळीच निकामी करण्यात आले. बॉम्ब निकामी करण्यात आला तेव्हा त्याच्या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला.
नक्षलवाद्यांनी हा बॉम्ब कल्व्हर्टखाली काँक्रीट आणि दगडांमध्ये लपवून ठेवला होता. जवानांनी पहिल्यांदा तेथून बॉम्ब काढण्याचा प्रयत्न केला, पण बॉम्ब खूप खोलवर पेरलेला होता. तिथून बॉम्ब काढणे प्राणघातक ठरू शकले असते. म्हणून, बीडीएस टीमने आयईडी जागीच नष्ट करणे अधिक चांगले आणि सुरक्षित मानले. यानुसार त्यांनी तिथेच नष्ट केला.
जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा प्लॅन उधळला
शोध मोहिमेवर गेलेल्या सतर्क जवानांमुळे आज मोठी दुर्घटना टळली. नक्षलवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला. ज्या ठिकाणी बॉम्ब निकामी करण्यात आला होता ती जागा भरण्यात आली आहे आणि रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात आला आहे. मोठ्या वाहनांना आणि जवानांना नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कल्व्हर्टखाली आयईडी पेरल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांच्या नापाक योजना उधळून लावण्यात आल्या.