सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 18:06 IST2025-05-14T18:05:17+5:302025-05-14T18:06:05+5:30
Naxalite Encounter: छत्तीसगडच्या करेगुट्टा भागातील नक्षलवाद्यांचे 150 हून अधिक बंकरही नष्ट केले.

सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
Naxalite Encounter: नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षादलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर चाललेल्या कारवाईत छत्तीसगड पोलिसांनी 31 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा केला, तर त्यांचे 150 हून अधिक बंकरही नष्ट केले. याशिवाय, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळाही जप्त केला. छत्तीसगडचे डीजीपी अरुण देव गौतम आणि सीआरपीएफ डीजी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डीजीपी अरुण देव यांच्या मते, कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही करेगुट्टा टेकडीवर हे ऑपरेशन 21 दिवस सतत सुरू होते. या कारवाईत राज्य पोलिसांनी केंद्रीय दलाच्या सहकार्याने 31 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यापैकी 28 जणांची ओळख पटली आहे, तर इतर तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मारल्या गेलेल्या माओवाद्यांवर 1.72 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
#WATCH | Bijapur, Chhattisgarh | Director General of the Central Reserve Police Force (CRPF), Gyanendra Pratap Singh says, "We are committed to fulfilling the resolve taken by Union Home Minister Amit Shah to end naxalism by 31st March 2026...We have recovered 31 bodies (of… https://t.co/7H3bZVlvwtpic.twitter.com/mSSsLQTnHg
— ANI (@ANI) May 14, 2025
मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त
डीजीपींच्या मते, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोघे अतिशय खास आणि विभागीय पातळीचे होते. या कारवाईत महिला नक्षलवादीदेखील मारल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, 150 हून अधिक बंकरही नष्ट केले आहेत. या ठिकाणांवरुन एसएलआर रायफल्स, ऑटोमॅटिक शस्त्रे, 450 आयईडीसह वैद्यकीय-विद्युत उपकरणेदेखील जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांचे 18 सैनिकही जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आङे.
गृहमंत्री अमित शाहांचा संकल्प...
केंद्रीय राखीव पोलिस दलाचे(CRPF) महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह म्हणतात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही 31 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. कोब्रा, CRPF, छत्तीसगड पोलिसांच्या पथकांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. यापूर्वी कोणत्याही कारवाईत इतके मोठे यश मिळाले नाही, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे.