पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे भारतीय लष्कराने जमीनदोस्त केले. दुसरीकडे याच काळात नक्षलविरोधी मोहिमेलाही मोठे यश आले. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये २२ नक्षलवादी ठार झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात नक्षल विरोधी मोहीम हाती घेण्यात आली होती. परिसरात सुरक्षा जवानांकडून मोहीम सुरू असतानाच नक्षल्यासोबत चकमक सुरू झाली.
पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी (७ मे) सांगितले की, कर्रेगुट्टातील डोंगरा भागात छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर २१ एप्रिलपासून मिशन संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत २४ हजार जवान सामील आहेत.
२२ नक्षलवाद्यांना कंठस्नान
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'बुधवारी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात २२ नक्षलवादी ठार झाले. गेल्या सोमवारी १ महिला नक्षलवाद्यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता.
यापूर्वी २४ एप्रिल रोजी तीन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले होते. बीजापूर जिल्ह्यातील दक्षिण पश्चिम सीमावर्ती भागात असलेल्या जंगलात नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मिशन संकल्प हाती घेण्यात आले आहे.