सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:18 IST2025-12-18T13:18:06+5:302025-12-18T13:18:42+5:30
Sukma Naxal Encounter: बस्तरमध्ये 84 लाख रुपये इनाम असलेल्या 34 नक्षलवाद्यांचे सरेंडर!

सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Naxal Encounter: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गोलापल्ली परिसरातील जंगल व डोंगराळ भागात गुरुवारी (18 डिसेंबर) पहाटे डीआरजी (District Reserve Guard) जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. ठार झालेल्यांमध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. तसेच, घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, संपूर्ण परिसराला वेढा देत शोधमोहीम सुरूच आहे.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख जाहीर
परिसरात नक्षलवादी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर डीआरजीची टीम शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आली होती. यादरम्यान, नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला, तर सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सकाळपासून दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. यात तीन नक्षलवादी ठार झाले. माडवी जोगा उर्फ मुन्ना, सोढी बंडी आणि नुप्पो बजनी (महिला) अशी या तिघांची नावे झाली आहे. हे तिघेही किस्टाराम एरिया कमिटीशी संबंधित सक्रिय नक्षलवादी होते. तिघांवरही प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
एसपींकडून ऑपरेशनची थेट देखरेख
चकमकीनंतर गोलापल्ली आणि आसपासच्या जंगल-डोंगराळ भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुकमा एसपी किरण चव्हाण स्वतः संपूर्ण ऑपरेशनवर थेट नजर ठेवून आहेत. गोलापल्ली परिसरात अद्याप शोधमोहीम सुरूच असून, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात येणार आहे.
छत्तीसगडमध्ये 284 नक्षलवादी ठार
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये विविध चकमकींमध्ये एकूण 284 नक्षलवादी ठार झाले आहेत. यापैकी 255 नक्षलवादी बस्तर विभागातील बीजापूर, सुकमा, दंतेवाडा यांसह 7 जिल्ह्यांत ठार झाले. रायपूर विभागातील गरियाबंद जिल्ह्यात 27, तर दुर्ग विभागातील मोहला-मानपूर-अंबागढ चौकी जिल्ह्यात 2 नक्षलवादी ठार झाले आहेत.
बस्तरमध्ये 34 इनामी नक्षलवाद्यांचे सरेंडर
दरम्यान, बस्तरमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. बीजापूर जिल्ह्यात 16 डिसेंबर रोजी एकूण 84 लाख रुपयांच्या इनामाचे 34 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत समाजाच्या मुख्य प्रवाहात परतले आहेत. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले की, ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दृढ इच्छाशक्तीच्या अनुषंगाने छत्तीसगड नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ठोस प्रयत्नांचे फलित आहे.