"नवज्योत सिंग सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:09 PM2021-09-29T13:09:38+5:302021-09-29T13:18:05+5:30

Sukhbir Singh Badal And Navjot Singh Sidhu : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एक 'मिसगायडेड मिसाईल' असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे.

navjot singh sidhu is misguided missile that does not know where to go says sukhbir singh badal | "नवज्योत सिंग सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं"

"नवज्योत सिंग सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं"

Next

नवी दिल्ली - कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी (Navjot Singh Sidhu) आता राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एक 'मिसगायडेड मिसाईल' असल्याचं म्हणत बादल यांनी निशाणा साधला आहे. "सिद्धू हे दिशाहीन मिसाईल असून त्यांना कुठे जायचंय हेच माहीत नाही" असं म्हटलं आहे. बादल यांनी चंदीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे. 

"मी आधीच सांगितले होते की नवज्योत सिंग सिद्धू हे एक दिशाहीन मिसाईल आहे, ज्याला माहीत नाही की ते कुठे जाईल किंवा कोणास मारेल. त्यांनी सर्वात आधी पंजाबकाँग्रेस अध्यक्ष बनून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नाश केला आणि आता त्यांच्या पक्षाचा नाश केला" असा शब्दांत बादल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "सिद्धूंनी पंजाब वाचवण्यासाठी मुंबईला निघून जावं. मी आधीच सिद्धूबद्दल इशारा दिला होता, सिद्धू अहंकारी माणूस आहे, हे पंजाबमधील प्रत्येक मुलाला हे माहीत आहे. त्यामुळे जर सिद्धूंना पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं, अशी मी त्यांना विनंती करतो" असा सणसणीत टोला देखील सुखबीर सिंग बादल यांनी लगावला आहे. 

"तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरुवात"

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये "तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरुवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचं ट्विट केलं होतं. "मी तुम्हाला सांगितले होते… ती एक स्थिर व्यक्ती नाही आणि पंजाब राज्यासाठी योग्य नाही" असं अमरिंदर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"काँग्रेससारख्या जुन्या पक्षात अपमान आणि छळासाठी जागा आहे?" 

अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचे सांगितले. पक्षाला माझ्याबाबत शंका का होती. हे मला समजत नाही आहे असं देखील म्हटलं आहे. यानंतर अमरिंदर यांनी पक्षात आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल, असा सवाल केला होता. "काँग्रेसमध्ये रागाला स्थान नाही, पण अपमान आणि छळासाठी आहे?" असं म्हणत पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अमरिंदर यांनी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांच्या विधानाचा देखील चांगलाच समाचार घेतला. पक्षात रागाला स्थान नाही, असं उत्तर त्यांनी अमरिंदर यांच्या टीकेला दिलं होतं. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी सुप्रीया श्रीनेत यांनी उत्तर दिलं. "हो, राजकारणात रागाला कुठलंली स्थान नाही. पण काँग्रेससारख्या इतक्या जुन्या पक्षात अपमान आणि छळ करण्यासाठी जागा आहे?" असा सवाल त्यांनी केला. "माझ्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जातेय, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत काय होत असेल?" असं देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं. 
 

Web Title: navjot singh sidhu is misguided missile that does not know where to go says sukhbir singh badal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.