देशी गायींप्रमाणे बैलही होणार दुर्मीळ
By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:17+5:302014-05-12T19:48:17+5:30

देशी गायींप्रमाणे बैलही होणार दुर्मीळ
>* न्यायालयाचा शर्यतीवरील बंदीचा परिणामगणपती कोळी : कुरुंदवाड बदलती यांत्रिकी शेती यामुळे शेतकर्यांकडील बैलांची संख्या घटली आहे. खिलारी जातिवंत बैल शर्यतींसाठी पाळले जात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीवर कायमची बंदी आणल्याने देशी गायींप्रमाणे बैलही दुर्मीळ होण्याची शक्यता आहे.पूर्वी ग्रामीण भागात बहुतेक शेतकर्यांजवळ बैल असत. शेतीच्या कामांबरोबर यात्रा, जत्रा, वाहतूक, प्रवासासाठी गाडीला जुंपण्यासाठी बैलांचा वापर होत असे. वाहतुकीची साधने नसल्याने ग्रामीण भागातील जीवन या बैलांवर चालत असे, तर शहरी भागात एक्का गाडी करून हमाली करण्यासाठी बैलांचा वापर होत असे. मात्र, बदलत्या काळानुसार शेतीनेही कात टाकली आहे. यांत्रिक शेतीमुळे घरोघरी शेतकर्यांच्या गोठ्यातील बैल कमी होऊन त्याठिकाणी ट्रॅक्टर आला आहे. शेतीच्या झटपट कामामुळे शेतकरी ट्रॅक्टरचाच वापर करू लागला आहे. त्यामुळे बैल पाळून भाडेतत्त्वावर काम करणार्या बैल मालकाला कामाअभावी बैल न परवडणारा होत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. तसेच शहरातील वाहतुकीसाठी ट्रक-टेम्पोसारखी छोटी-मोठी वाहतुकीची साधने निर्माण झाल्यामुळे शहरातील एक्का बैलगाडीही हद्दपार झाली आहे.ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी भाडेतत्त्वावर काम करणारे बैलगाडी मालक तुरळकच आहेत. मात्र, शर्यत शौकिनांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक गावात शर्यतीसाठी बैलांची जोपासना केली आहे. त्यामुळे बैलांची संख्या अद्याप तरी जिवंत आहे. शर्यतीमध्ये बैलांना अमानुष मारहाण करणे, शेपूट चावणे, बॅटरीने शॉक देणे अशा प्रकारांमुळे प्राणी मित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांनी बैलगाडी शर्यतीवर कायमचीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बैलांची जिवंत असलेली संख्या हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वी घरोघरी शेतकर्यांकडून देशी गायींची जोपासना केली जात असे. मात्र, शेतकर्यांकडून सत्त्वयुक्त दुधापेक्षा आर्थिकतेला महत्त्व दिल्याने देशी गायींची जागा जर्सी गायींनी घेतली आहे. त्यामुळे देशी गायी दुर्मीळ झाल्या आहेत. शेतकर्याला चार पैसे दिसत असले तरी सत्त्वयुक्त दुधाला व शारीरिक स्वास्थ्याला तो मुकला आहे. शर्यतीच्या निमित्ताने ग्रामीण भागात जातिवंत बैलांची जोपासना केली जात आहे. मात्र, आता शर्यतीलाही कायमची बंदी मिळाल्याने देशी गायींप्रमाणे बैलही दुर्मीळ होण्याची शक्यता आहे.