नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 06:22 IST2025-12-17T06:22:02+5:302025-12-17T06:22:47+5:30
सोनिया गांधी, राहुल गांधी व काही बड्या काँग्रेस नेत्यांना गोत्यात आणणाऱ्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात मंगळवारी ईडीलाच येथील राउस अॅव्हेन्यू न्यायालयाने धक्का दिला.

नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काही बड्या काँग्रेस नेत्यांना गोत्यात आणणाऱ्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात मंगळवारी ईडीलाच येथील राउस अॅव्हेन्यू न्यायालयाने धक्का दिला.
ईडीने मनी लॉड्रिगबाबत दाखल केलेले आरोपपत्र हे खासगी व्यक्तीच्या तक्रारीवर केलेल्या तपासावर होते, मात्र या प्रकरणाची फिर्याद दाखल केली नव्हती. त्यामुळे ईडीचे आरोपपत्र ग्राह्वा धरता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
'गुन्हा दाखल नाही तर तपास कुठला?'
न्या. विशाल गोगने यांनी म्हटले, नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे ईडीच्या युक्तिवादावर निर्णय देणे घाईचे ठरेल. सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. तरीही ईडीने तपास सुरू केला यावर कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले.
जर मूळ गुन्हा दाखल झालेले नाही, तर मनी लॉड्रिंगअंतर्गत ईडी कसा तपास करू शकते असा सवालही कोर्टाने उपस्थित केला. तसेच, या प्रकरणातील सोनिया, राहुल गांधी यांच्यासहित पाच अन्य आरोपींना फिर्यादीची प्रत दिली जाणार नाही असेही स्पष्ट केले. ईडीने या निर्णयावर अपिल दाखल केले जाईल असे स्पष्ट केले आहे. अखेर सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली.