'कच्चा लिंबू' समजू नका, राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेऊ; कलाकारांचा 'इरादा' पक्का, सरकारवर फसवणुकीचा 'ठप्पा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 09:13 AM2018-05-03T09:13:31+5:302018-05-03T11:38:59+5:30

केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

National Film Awards winners said that they will recieve awards only from president | 'कच्चा लिंबू' समजू नका, राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेऊ; कलाकारांचा 'इरादा' पक्का, सरकारवर फसवणुकीचा 'ठप्पा'

'कच्चा लिंबू' समजू नका, राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेऊ; कलाकारांचा 'इरादा' पक्का, सरकारवर फसवणुकीचा 'ठप्पा'

Next

नवी दिल्ली: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीत जमलेल्या कलाकारांनी घेतलेल्या असहकाराच्या भूमिकेमुळे केंद्र सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी होऊ घातलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी तीव्र विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमच्या मनात सरकारविषयी कोणतीही कटुता नाही. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देणार नाही, हे सांगितल्यामुळे कलाकारांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना आहे. त्यामुळे आम्ही आज पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र सरकारला पाठवले आहे. या पत्रावर 62 जणांच्या सह्या असल्याचे कलाकारांकडून घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत स्पष्ट करण्यात आले.

थोड्याचवेळात यासंबंधी दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.

आतापर्यंत दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येत असे. मात्र, यंदा पहिल्यांदाच या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. हा निर्णय ऐनवेळी जाहीर करण्यात आला. कारण, या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर विजेत्यांना पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. परंतु, चित्रपट महोत्सव विभागाच्या संचालकांकडून विजेत्या कलाकारांना या सोहळ्याच्या रंगीत तालमीसाठी पाचारण करण्यात आले तेव्हा 107 पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जातील, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली. अनेक कलाकरांनी इराणींकडून पुरस्कार स्वीकारण्यास नकार देत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. हे प्रकरण चिघळायला लागल्यानंतर स्वत: स्मृती इराणी त्याठिकाणी आल्या होत्या. त्यांना संबंधित कलाकारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रपती कार्यालयाकडूनच बदल करण्यात आले, असा दावा इराणी यांनी केला. मात्र, तुमच्या भावना मी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवेन, असे आश्वासन त्यावेळी इराणी यांनी दिले होते.
 

Web Title: National Film Awards winners said that they will recieve awards only from president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.