‘यलो’ फेम गौरी गाडगीळला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 22:59 IST2017-11-30T22:58:06+5:302017-11-30T22:59:35+5:30
नवी दिल्ली- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्या जाणा-या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी यलो फेम गौरी गाडगीळची निवड करण्यात आली आहे.

‘यलो’ फेम गौरी गाडगीळला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्या जाणा-या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी यलो फेम गौरी गाडगीळची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 दिव्यांगांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांचं वितरण ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत हे पुरस्कार देण्यात येतात. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, उत्कृष्ट कर्मचारी, दिव्यांगांसाठी कार्यरत असणा-या संशोधन संस्था अशा प्रकरच्या श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
मुंबईतील प्रणय बुरडे आणि पुण्यातील गौरी गाडगीळ या दोघांना मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील गौरी गाडगीळ ही डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. गौरीने या परिस्थितीशी दोन हात करत स्विमिंगमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. गौरीची जिद्द आणि तिचा प्रवास यावर 2014 साली ‘यल्लो’ नावाचा चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटासाठी गौरीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.
कोण आहे गौरी गाडगीळ?
स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये दोन वेळा रौप्य पदक पटकावलं
आतापर्यंत 55 स्पर्धा गौरीने जिंकल्यात
2003च्या नॅशनल पॅरालम्पिकमध्ये सुवर्ण पदक
तर उत्कृष्ट संस्थेसाठीचा पुरस्कार वाशीतील ईटीसी एज्युकेशन या संस्थेला जाहीर करण्यात आलाय. शिवाय उत्कृष्ट ब्रेल प्रेससाठीच्या पुरस्कारासाठी वरळीतील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासोबतच दिव्यांगांना संकेतस्थळ सुलभता निर्माण करण्यासाठी, संकेतस्थळ पुरस्कार जळगावच्या ‘द जळगाव पीपल को ऑप बँके’ला दिला गेलाय.