नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याने कार्यकर्त्याला लाथ मारली
By Admin | Updated: September 3, 2014 19:45 IST2014-09-03T19:45:14+5:302014-09-03T19:45:14+5:30
नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलम वानी यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याची घटना घडली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याने कार्यकर्त्याला लाथ मारली
>ऑनलाइन लोकमत
गांदरबल (काश्मीर), दि. ३ - नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलम वानी यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याची घटना घडली आहे. त्यांच्या या कृतीमुळे काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अडचणीत येऊ शकतात. वानी हे अब्दुल्लां यांचे निकटवर्ती आहेत. सभेतील घोषणाबाजीने संताप अनावर झाल्याने वानी यांचा तोल गेला व त्यांनी एका कार्यकर्त्यावर आपला राग काढला. वानी यांनी मंचावरून खाली उतरून एका कार्यकर्त्याला लाथ मारली परंतु लगेचच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थोपवले.
या घटनेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या भीमा गांदरबल येथील कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेख इशफाक जब्बार यांच्या समर्थकांनी पक्षाच्या विरोधात घोषणा देण्यास सुरवात केली. जब्बार यांना निवडणुकीचे तिकीट देण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते. परंतू आता पक्ष आपल्या आश्वासनापासून फारकत घेत असल्याने जब्बार यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी जब्बार यांच्या समर्थकांचा विरोध करत त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. तसेच गांदरबल येथून ओमर अब्दुल्ला यांनीच निवडणुक लढवावी अशी मागणी केली. जब्बार यांना तिकिट देऊन आपण पराभवाला आमंत्रण देत असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. या वादाचे रुपांतर हाणामारीत होण्याची शक्यता लक्षात घेत पक्षाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. यापूर्वीही एका व्यक्तीने मुख्यमंत्री अब्दुल्ला यांचे आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता काश्मीरचे उच्च शिक्षामंत्री मोहम्मद अकबर लोन यांनी त्या व्यक्तीला अपमानित केले होते.