सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 21:20 IST2025-10-23T20:38:16+5:302025-10-23T21:20:55+5:30
Satyapal Malik News: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहत असताना जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक राजकीय टीकाटिप्पण्या सुरू झाल्याने सभागृहातील वातावरण तापले. तसेच सत्ताधारी नॅशनल कॉन्फ्रन्स आणि विरोधी पक्षामधील आमदार आमनेसामने आले.

सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहत असताना जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक राजकीय टीकाटिप्पण्या सुरू झाल्याने सभागृहातील वातावरण तापले. तसेच सत्ताधारी नॅशनल कॉन्फ्रन्स आणि विरोधी पक्षामधील आमदार आमनेसामने आले.
सभागृहामध्ये सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख येताच नॅशनल कॉन्फ्रन्स आणि भाजपाच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमकी उडू लागल्या. नॅशनल कॉन्फ्रन्सचे आमदार बशीर वीरी यांनी सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळाचा वादग्रस्त कार्यकाळ म्हणून उल्लेख केला. त्याला भाजपाचे आमदार श्यामलाल शर्मा यांनी आक्षेप घेतला. तसेच हे विधान रेकॉर्डवरून काढण्याची मागणी केली. त्यावर सभागृहाचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथर यांनी ही मागणी फेटाळून लावली. मात्र दिवंगत व्यक्तींचा सन्मान राखणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी केली. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यही लक्षात घेणं आवश्यक आहे, असे सांगितले.
सत्यपाल मलिक यांनी काही असे निर्णय घेतले, ज्या निर्णयावर जनता आजही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, ही बाब इतिहासात नोंदवली जाईल, असे वीरी म्हणाले. वीरी यांच्या या विधानाला भाजपाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. तसेच ही श्रद्धांजली वाहण्याची वेळ आहे. राजकीय टीका टिप्पणी करण्याची नाही, असे सांगितले.
तर भाजपाचे आमदार विक्रम रंधावा यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट २०१९ हा दिवस जम्मू काश्मीरसाठी ऐतिहासिक होता. सत्यपाल मलिक हे असामान्य व्यक्ती होते. म्हणूनच भाजपाने त्यांना पाच राज्यांचे राज्यपाल बनवण्यात आले होते. योगायोगाने मलिक यांचं निधन ५ ऑगस्ट रोजी झालं. त्यामुळे हा दिवस आणखीच ऐतिहासिक ठरला, असेही रंधावा म्हणाले. रंधावा यांच्या या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फ्रन्सचे नजीर गुरेजी यांनी आक्षेप घेतला. सत्यपाल मलिक यांनी काही घटनाबाह्य पावलं उचलली, असा आरोप त्यांनी केला. त्यावर वन नेशन वन कॉन्स्टिट्युशनचं लक्ष्य गाठण्यासाठी मलिक यांचं योगदान महत्त्वपूर्ण होतं, असे भाजपाचे आमदार नरेंद्र सिंह म्हणाले.