नरेंद्र मोदींचा भाजप खासदारालाच दणका
By Admin | Updated: June 1, 2014 16:44 IST2014-06-01T16:44:39+5:302014-06-01T16:44:39+5:30
त्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पर्सनल स्टाफ म्हणून नेमू नये या फतव्याला हरताळ फासणा-या भाजपच्या एका खासदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार दणका दिला आहे.

नरेंद्र मोदींचा भाजप खासदारालाच दणका
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली,दि. १ - मंत्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पर्सनल स्टाफ म्हणून नेमू नये या फतव्याला हरताळ फासणा-या भाजपच्या एका खासदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार दणका दिला आहे. मोदींच्या आदेशाने संबंधित खासदाराने वडिलांना वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून नेमण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर नरेंद्र मोदींनी पहिल्याच आदेशात केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचा पर्सनल स्टाफ नेमण्यास मज्जाव केला होता. या निर्णयामुळे केंद्रीय मंत्र्यांना वैयक्तिक कर्मचारी म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्याला नेमण्यास वाव उरला नव्हता. मोदींचा हा आदेश मंत्र्यांसाठी असला तरी याचे अनुकरण खासदारांनीही करावे असे अपेक्षित होते. मात्र उत्तरप्रदेशमधील बाराबांकी येथून निवडून आलेल्या भाजप खासदार प्रियंका सिंह रावत यांनी वैयक्तिक प्रतिनिधी या पदावर वडिल उत्तम राम यांची नेमणूक केली होती. विशेष म्हणजे २६ मे म्हणजेच मोदींच्या शपथविधीच्या दिवशी प्रियंका रावत यांनी मतदार संघातील सर्व सरकारी अधिकारी व कार्यालयांना एक परिपत्रक पाठवून ही माहिती दिली होती. सर्व सरकारी कामे व विकास कामांसाठी उत्तम राम यांची वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक करत असल्याचे रावत यांनी परिपत्रकात म्हटले होते. रावत यांच्या या निर्णयावर प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठवल्यावर खुद्द नरेंद्र मोदींनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. रविवारी मोदींनी प्रियंका रावत यांना फैलावर घेत यापदावर वडिलांना न नेमता अन्य कोणाला नेमावे असे आदेश दिले. यानंतर प्रियंका यांनी पर्सनल स्टाफमध्ये कोणत्याही नातेवाईकाचा समावेश केलेला नाही असे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मोदींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपचे अन्य खासदारही सावध झाले आहेत.